शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ! जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा, वाचा आगामी १० दिवसाचा हवामान अंदाज?

मार्च 14, 2026 10:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२६ । एकीकडे वाढत्या उष्णतेने जळगावकर होरपळून निघत असताना हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागच्या काही दिवसापासून जळगाव शहरासह जिल्ह्यातील पारा चाळीशीच्या वर गेल्यानं दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र, मात्र, हवामान विभागाने १७ ते २० मार्चदरम्यान जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. या पावसामुळे तापमानापासून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल पण शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

rnjl

१५ मार्चपासून जिल्ह्यात काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते. मात्र, त्याच वेळी वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणदेखील वाढणार असल्याने, १५ मार्चपासून मोठ्या प्रमाणात उकाडा जाणविण्याची शक्यता आहे. १७ ते २० मार्चपासून राज्यासह जळगाव जिल्ह्यातही अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, केवळ पाऊसच नाही, तर वादळी वारा आणि गारपिटीचाही इशारा दिला आहे. त्यानंतर २१ व २२ मार्चला पावसाचा जोर कमी होऊन ढगाळ वातावरण राहू शकते. २३ मार्चनंतर पुन्हा कोरडे वातावरण निर्माण होऊन तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

या संभाव्य अवकाळी पावसामुळे नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरू शकते. सध्या जिल्ह्यात गहू, हरभरा आणि मका ही रब्बी पिके काढणीच्या टप्प्यावर असल्याने पाऊस किंवा गारपीट झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करण्याचा सल्ला दिला आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील १० दिवसांचा हवामानाचा अंदाज
१४ ते १६ मार्च: उन्हाची तीव्रता कमी होईल, मात्र उकाडा वाढणार
१७ ते २० मार्च : जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीची स्थिती.
२१ ते २२ मार्च: पावसाचा जोर कमी होईल, मात्र काही अंशी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता
२३ मार्चनंतर – जिल्ह्यात कोरडे वातावरण तयार होऊन, पुन्हा उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now