जळगाव लाईव्ह न्यूज । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. १४ एप्रिल २०२६ पासून टप्प्याटप्प्याने या विभागातील काही प्रमुख मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामध्ये नागपूर दुरांतो आणि अमरावती एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांचा समावेश असून, जळगाव आणि भुसावळ स्थानकांवरील त्यांच्या वेळेत बदल झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अमरावती
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अमरावती गाडीच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन वेळापत्रकानुसार आता नाशिकरोड येथे तिचे पहाटे ००.१५ वाजता आगमन असेल. पुढे जळगाव येथे ०३.१३, भुसावळ येथे ०३.४०, मलकापूर येथे ०४.३८, नांदुरा येथे ०४.५८, शेगाव येथे ०५.१८, अकोला येथे ०६.१०, मूर्तिजापूर येथे ०६.४८, बडनेरा येथे ०७.५७ आणि अखेरीस अमरावती येथे ०८.३५ वाजता आगमन, असे नवीन वेळापत्रक १४ एप्रिलपासून लागू होणार आहे. अमरावती एक्स्प्रेसचे जळगाव स्थानकावर साधारणपणे ३३ मिनिटे तर भुसावळ स्थानकावर २० मिनिटे उशिरा यापुढील काळात आगमन होईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूर दुरांतो
गाडी क्रमांक १२२८९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूर दुरांतो एक्स्प्रेस या गाडीच्या प्रस्थान वेळेतही लक्षणीय बदल करण्यात आला असून, ती आता रात्री ०८.३५ वाजता सुटेल, जी सध्या रात्री ०७.५५ वाजता सुटते. या गाडीचे भुसावळ येथे पहाटे ०२.४५ आणि बडनेरा येथे ०५.४८ असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १२२९० नागपूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेसचे बडनेरा येथे रात्री १०.१० आणि भुसावळ येथे पहाटे ००.५० या वेळेत आगमन होईल.
प्रवाशांनी सुधारित वेळापत्रकाची माहिती आधीच घेऊन तिकीट आरक्षण व प्रवास नियोजन करावे, असेही आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच संबंधित स्थानकांवरील डिजिटल फलक, चौकशी केंद्रे आणि अधिकृत संकेतस्थळांवर अद्ययावत वेळांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.







