जळगाव लाईव्ह न्यूज : गणपती विसर्जनाशी संबंधित विविध घटनांमध्ये जळगाव जिल्ह्यात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर, चौघांना वाचविण्यात यश आले आहे. राज्यात नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर, १२ जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

जामनेर तालुक्यातील सामरोद येथे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी गेलेल्या संदीप सुभाष तेली (३०, रा. सामरोद, ता. जामनेर) यांचा कांग नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत जळगाव येथे राहुल रतीलाल सोनार (३४, रा. वाघ नगर) हा तरुण गिरणा पंपिंग परिसरात गिरणा नदी पात्रात बुडाला. यावलला एकाचा मृत्यू यावल येथे रोहिदास शिवराम लहानगे (वय ४२, रा. खालकोट) याचा मनुदेवी परिसरातील पाझर तलावात विसर्जनावेळी बुडून शनिवारी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रविवारी आढळून आला. ममुराबादचा २५ वर्षीय तरुण हा गिरणा नदी पात्रात बेपत्ता झाला. त्याचा शोध सुरू आहे. विसर्जनासाठी गेलेला हा तरुण आई-वडिलांच्या डोळ्यादेखत गिरणा पात्रात बुडाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी भोकणी शिवारात नवीन बायपास लगत घडली.

राज्यातील घटना
पुणे जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जण बुडाल्याची माहिती आहे. नांदेड जिल्ह्यातील गंडेगाव येथे नदीत तीन जण वाहून गेले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि कळवण येथेही अशाच प्रकारच्या दुर्घटना घडल्या आहेत, जिथे पाच जण वाहून गेले. ठाण्यातील शहापूर तालुक्यातील मुंडेवाडी येथील तीन जण धरणाजवळील भार्गवी नदीच्या प्रवाहात वाहून गेले.








