जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२३ । ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक देऊन झालेल्या अपघातात तीन तरुण जागीच ठार झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील वडनेर गावाजवळ घडली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील दोन तरुणांचा समावेश असल्याचे समोर येत आहे.

नेमकी घटना काय?
बुलढाणा जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर वडनेर गावाजवळील दि. १५ नोव्हेंबर बुधवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास तीन तरुण दुचाकीवरून जात असतांना त्याचवेळी मलकापूर येथून नांदुराकडे प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने निघाली होती. ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या अपघातात जळगाव जिल्ह्यातील स्वप्निल करणकार (वय २७) गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्ष) तर कल्याण येथील आकाश राजू आखाडे अशी मयत तरुणांची नावे आहेत. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनस्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील रुग्णालयात पाठवले आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन भाऊबीजीच्या दिवशी ३ तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.







