⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाव : लग्‍न लागण्यापुर्वी वऱ्हाडातील तिघांसोबत घडलं अघटीत, घटना कळताच लग्नमंडपात पसरली शोककळा..

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२३ । जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या रस्ते अपघाताचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. अशातच भरधाव बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडलीय. ही घटना वरणगाव – बोदवड मार्गावरील सुसरी (ता. भुसावळ) गावाजवळ घडला.

विशेष लग्न मुहूर्ताला वेळ असल्यामुळे वऱ्हाडी मंडळींपैकी भावकीतील हे तिघे जण विवाहापूर्वी नागेश्‍वर महादेवाच्या दर्शनासाठी जात होते. मात्र रस्त्यातच त्यांच्यावर काळाने झडप घातली. या अपघाताची वार्ता लग्नमंडपासह गावात सर्वत्र शोककळा पसरली.

मनूर बुद्रुक (ता. बोदवड) गावातील शेळके परिवारातील मुलाचे लग्न सोमवारी (१३ मार्च) पिंपळगाव येथील मुलीसोबत होते. लग्नानिमित गावातील व भाऊकीतील पाहुणे मंडळी पिंपळगाव खुर्द येथे वऱ्हाडी म्हणून जमले होते. मुहुर्ताला वेळ असल्याने वऱ्हाडातील सचिन राजेंद्र शेळके (वय २६), भागवत प्रल्हाद शेळके (वय ४३) व जितेंद्र कैलास चावरे (वय ३२, सर्व रा. मनूर बु.) हे तिघे येथून जवळच असलेल्या नागेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी दुचाकीने बोदवड – वरणगाव मार्गावरून निघाले.

सुसरी शिवारात गावाजवळच वरणगावकडून येणाऱ्या भरधाव बसने समोरून धडक दिल्याने तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. विजय जगन्नाथ शेळके यांच्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरलेला बसचालक दिलीप आप्पा तायडे (भुसावळ आगार) याच्याविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लग्‍न सोहळ्यापुर्वी झालेल्‍या दुर्घटनेमुळे लग्‍नमंडपात शोककळा पसरली होती. वऱ्हाडातील काही मंडळी लग्‍नमंडपात थांबले तर काही अपघातस्थळी पोहचले होते. येथे मृतदेह पाहून नातेवाईकांचा आक्रोश सर्वांच्या अंगावर काटा आणणारा होता. जितेंद्र चावरे याची दुचाकी भागवत शेळके चालवत होता. तर दोघे मागे बसले होते, असे विजय शेळके यांनी फिर्यादीत म्हटले आहे.