पाचोऱ्यात दिवसा ढवळ्या दरोडा टाकणारी टोळी गजाआड; पोलिसांकडून बनावट पिस्तुलासह रोकड जप्त!

जून 16, 2026 3:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | पाचोरा शहरात दिवसाढवळ्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत जबरी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पाचोरा पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीतील रोख रकमेसह गुन्ह्यात वापरलेले बनावट पिस्तूल (बनावट कट्टा) जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या या धडक कामगिरीमुळे पाचोरा शहरासह परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

pc news

मिळालेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी पाचोरा येथील लक्ष्मी आंगन कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घरी काही जणांनी अमेझॉनचे पार्सल असल्याचे सांगून प्रवेश केला. घरात शिरताच आरोपींनी आपले खरे रूप दाखवत थेट बंदुकीचा धाक दाखवला. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना एका ठिकाणी डांबून कपाटातील रोख रक्कम आणि मुलाच्या गळ्यातील पैसे ओरबाडून घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर याला अटक केली. तपासादरम्यान त्याचा मामा गोकुळ महादू वाघ (पाटील) याचाही सहभाग उघड झाला. तसेच नाशिक येथील आणखी एका आरोपीकडून चोरीतील ७,७०० रुपयांची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले बनावट पिस्तूल जप्त करण्यात आले.

पोलिस तपासात फिर्यादीच्या घरी सोन्याच्या चिपा असल्याची माहिती आरोपींना मिळाल्याने ही चोरी करण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचा शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now