जबरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । भुसावळ शहरात जबरी चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघा चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. शुभम शेखर पाटील (वय १८, रा. अकलुज ता.यावल) राज रामचरण गुप्ता (वय १९, रा. अकलुज ता. यावल), तर पाडळसा (ता. यावल) येथील एक अल्पवयीन मुलगा अशा तिघांच्या मुसक्या आवळल्या.  याप्रकरणी शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, शहरात तलवार, चेन व चाकूच्या धाकावर तिघे जबरी चोरी करीत असत. दरम्यान, सोमवारी रात्री तापी पुलावर काही संशयीत जबरी चोरीच्या उद्देशाने आल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळाल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मोहंमद अली सैयद, इकबाल अली सैयद, हेड कॉन्स्टेबल सुपडा पाटील आणि कॉन्स्टेबल सचिन काटे यांना तापी पुलावर कारवाईसाठी पाठविले. यावेळी पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूस उभे असलेल्या लोकांची तपासणी केली.  

यावेळी पोलिसांनी आणखी पुढे जाऊन तपासणी केली असता, पुलाजवळ काळ्या रंगाची बजाज पल्सर मोटरसायकल (एमएच-१९, डीआर ५१५०) जवळ उभ्या असलेल्या तीन तरुणापैकी दोन मुलं अचानक फैजपुरच्या दिशेने पळु लागले. तर एक मुलगा मोटरसायकल चालु करुन पळण्याचा प्रयत्न करू लागला असता, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे तिन्ही जण चोरी करण्यासाठी भुसावळात येत असल्याचे सांगण्यात आले. जाकीर हारून मन्सुरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीतांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.