यंदा भारनियमनाला रामराम ! वीजपुरवठा पुरेसामुळे भारनियमनाची गरज भासणार नाही, मुख्य अभियंता हुमने
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । दरवर्षी एन उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने विद्युत पुरवठ्यावर दबाव येतो, ज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारनियमनाचा (Load Shedding) मार्ग वापरला जातो. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून महावितरणकडे २० टक्के वीज अधिक राहत आहे. पुढील पाच वर्षांच्या प्रस्तावानुसार वीज शिल्लक १५ ते १८ टक्के राहण्याची शक्यता आहे. अर्थात, महावितरणला यंदा उन्हाळ्यात भारनियमनाची गरज भासणार नाही, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता कैलास हुमने यांनी दिली.
भारनियमनाची संकल्पनाच बंद करण्याचा प्रयत्न महावितरणकडून केला जाताे आहे. यंदाही विविध औष्णिक केंद्रांमधील वीजनिर्मिती योग्य प्रमाणात असून, अन्य कंपन्यांकडूनही गरजेनुसार विजेची खरेदी करून पुरेशा प्रमाणात वितरण सुुरू आहे. मार्चच्या मध्यंतरास उष्णतेत वाढ झाली आहे. तापमान ३८ अंशांपर्यंत पोहाेचले आहे. परिणामी विजेच्या मागणीत दीड हजार मेगावॅटने वाढ झाली आहे.
रविवारी सकाळी ही मागणी २२ हजार ४९० मेगावॅटपर्यंत पोहाेचली होती. तर दुपारी २३ हजार मेगावॅटपर्यंत मागणी पोहाेचली. वीजनिर्मितीच्या तुलनेत मागणी याच प्रमाणात आहे. कृषीपंपांनाही दहा तास वीजपुरवठा केला जाताे. औद्याेगिकनंतर कृषी व घरगुती अशा क्रमानुसार वीज वितरणाला प्राधान्य असेल, असे हुमने म्हणाले.