तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदणी करावी : जिल्हाधिकारी
जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी केले आहे.
तृतीय पंथीयांच्या तक्रार निवारणासाठी गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, समितीचे सचिव तथा सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी या बैठकीस उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, तृतीयपंथीयांच्या नोंदणीसाठी NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यावर तृतीयपंथीयांनी नाव नोंदणी करून आपले ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. तृतीयपंथीयांच्या समस्या जिल्हास्तरीय समितीकडे आल्यावर तत्काळ कार्यवाही करावी. या तक्रारी, समस्यांचे विहित कालावधीत निवारण करण्यात यावे. प्राप्त तक्रारींबाबत पडताळणी करून आवश्यकतेनुसार तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाकडे शिफारस करावी. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांना लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे. त्यांच्यासाठी लसीकरण शिबिराचे नियोजन करावे. कामाच्या ठिकाणी तृतीयपंथीयांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात.
सुरुवातीस सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त समाजकल्याण श्री. पाटील यांनी समितीच्या कामकाजाची आणि विषय पत्रिकेची माहिती देऊन आतापर्यंत समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामकाजाचीही माहिती दिली.