⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

खडसेंबाबत गिरीश महाजनांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ, काय म्हणाले वाचा…

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाशिकच्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनात एकनाथ खडसे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि माझ्याजवळ आले होते. यावेळी खडसेंनी फडणवीसांना सोबत बसून जे काही असेल ते मिटवून टाकू, जाऊ द्या, अशी ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला.

मात्र महाजनांच्या या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली असून असं काय प्रकरण आहे जे एकनाथ खडसेंना महाजन-फडणवीस या दोघांसोबत बसवून मिटवायचं आहे, याची चर्चा आता सुरु झाली आहे.

चाळीसगाव येथील कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, खडसे यांच्या मनामध्ये काय चाललंय? त्यांना कोणतं प्रकरण मिटवायचं आहे? हे सगळं कार्यक्रमात गर्दी असल्यामुळे मी त्यांना विचारलं नाही, असेही गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.

नाशिकच्या महानुभाव पंथाचा तो कार्यक्रम होता. सभेतलं भाषण संपल्यावर एकनाथ खडसे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्याजवळ आले होते. मंत्रीमंडळ विस्तार बाकी असल्याने बसायचा विचार करु, असे खडसेंना म्हणाल्याचंही महाजनांनी सांगितलं. पण खडसेंना नेमका कोणता विषय मिटवायचा आहे, हे मला माहिती नाही, असंही सांगायला गिरीश महाजन विसरले नाहीत.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची अमित शहा यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे. कुठल्याशा कामानिमित्त खडसे अमित शहा यांना भेटणार होते. त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांना तशी माहिती दिली होती. ही बाब समोर आल्यानंतर खडसेंच्या मनात काय? पुन्हा घरवापसी करणार का? अशा चर्चाही झाल्या. पण खडसेंनी अशा साऱ्या वृत्तांचं खंडन केलं होतं.