जळगाव लाईव्ह न्यूज । खरेदीच्या बहाण्याने येऊन सोन्याची चेन लांबविणाऱ्या सराईत आंतरराज्यीय चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेलंगणातून मुसक्या आवळल्या. भास्कर किसन बानोथ (२२, रा. नगाई पल्ली तांडा, जि. यदाद्री भुवनागिरी, तेलंगणा) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या सोन्यापासून बनवलेली सोन्याची लगड देखील हस्तगत केली आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

जळगाव शहरातील सुभाष चौकातील नयनतारा अँड सन्स (आर.सी. बाफना ज्वेलर्स) मध्ये एक अज्ञात इसम सोन्याची चेन खरेदी करण्याच्या बहाण्याने आला होता. त्याने सेल्समनला बोलण्यात गुंतवून १९.३५० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन २ लाख ४९ हजार अत्यंत शिताफीने चोरून नेली होती.या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही चोरी तेलंगणातील चोरट्याने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. पो.कॉ. महेश सोमवंशी, मुबारक देशमुख, पंकज खडसे यांच्या पथकाने तेलंगणा राज्यातील सायबराबाद येथून भास्कर बानोथ याला ताब्यात घेतले. त्याने सोन्याची साखळी वितळवून तिची लगड तयार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडन लगड हस्तगत केली.

यशस्वी पथक ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वल्टे, आणि कर्मचारी प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, सिद्धेश्वर डापकर व महेश सोमवंशी यांनी केली आहे.








