जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठी भाजप, शिंदे गटाने घेतले इतके अर्ज?

जानेवारी 30, 2026 2:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२६ । जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून यासाठी अर्ज विक्रीच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून प्रत्येकी ६ असे १२ अर्ज तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून महापौर पदासाठी २, उपमहापौर पदासाठी २ असे ४ अर्ज घेण्यात आले. आता २ फेब्रुवारी रोजी कोण अर्ज भरणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

jalgaon-manapa-politics-bjp-shivsena

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळविले आहे. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना शिंदे गट तिसऱ्या नंबरवर गेला. भाजपने ४६ तर शिवसेना शिंदे गटाने २२ जागांवर यश मिळविले. त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गट व अपक्ष असे मिळून आता महायुतीचे ७० संख्याबळ झाले आहे. त्यामुळे महापौर हा भाजपचा व उप महापौर हे शिवसेनेचा होणार हे सूत्र निश्चित झाले आहे.

दरम्यान, महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या निवडीची प्रक्रिया २८ जानेवारीपासून सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महापौर व उपमहापौर साठी एकही अर्ज घेण्यात आला नव्हता. मात्र अंतिम दिवशी शुक्रवारी दि. ३० रोजी भारतीय जनता पक्षातर्फे मनपा गटनेते प्रकाश बालाणी, उपगटनेते नितीन बरडे, प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील तसेच विशाल त्रिपाठी यांनी अर्ज घेतले. प्रकाश बालाणी यांनी महापौर पदासाठी चार अर्ज घेतले असून नितीन बरडे यांनी उपमहापौर पदासाठी चार अर्ज घेतल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी महापौर पदासाठी दोन व उपमहापौर पदासाठी दोन असे अर्ज घेतले. अशा प्रकारे भाजपकडून एकूण १२ अर्ज घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर शिवसेना शिंदे गटाकडून चौथ्यांदा निवडून आलेले नगरसेवक मनोज सुरेश चौधरी यांनी महापौर पदासाठी २ तर उप महापौर पदासाठी २ अर्ज घेतले आहे. आता उमेदवारी अर्ज कोण भरते याकडे लक्ष लागून असून शहराच्या विकासाच्या दृष्टीने आगामी महापौर-उपमहापौर कोण असतील याची उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now