⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

भुसावळ मोठी राजकीय उलथापालथ होणार, पाच नगरसेवक भाजपाच्या वाटेवर

पालिका निवडणुकीपूर्वी भूकंप : राष्ट्रवादीतील गटबाजी भाजपाच्या पथ्थ्यावर

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । जिल्ह्यात जसजशा मनपा, पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत तशी राजकीय हवा देखील गरम होत आहे. गेल्या वर्षी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या दहा नगरसेवकांमधून दोन नगरसेवक आता पुन्हा भाजपच्या गळाला लागले असून पाच माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आगामी पालिका निवडणूकीपूर्वी शहरात मोठा राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीपूर्वी होणार प्रवेश सोहळा
2016 च्या पालिका निवडणूकीत माजी आमदार एकनाथ खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात भाजपची एकहाती सत्ता आली होती. यानंतरच्या काळात मात्र खडसेंनी भाजपला जय श्रीराम करुन राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. खडसेंना मानणार्‍या लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळेंसह दहा नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. नोव्हेंबर 2021 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा झाला. मात्र आता वर्षभरातच राष्ट्रवादीची राज्यातील सत्ता गेल्याने खडसेंसोबत गेलेले दोन नगरसेवक भाजपच्या गोटात सहभागी झाले आहेत. मेघा वाणी यांचे पती देवेंद्र वाणी व किरण कोलते यांची भाजपसोबत सलगी वाढली आहे. ते कार्यक्रमांमध्येही आमदार सावकारेंसोबत दिसू लागले आहेत. तर आता जनआधार पार्टीकडून निवडून आलेले दोन व भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले तीन नगरसेवक पून्हा भाजपच्या संपर्कात आहेत. निवडणूकीपूर्वी त्यांचा अधिकृत प्रवेश सोहळा होऊ शकेल, अशीही सुत्रांची माहिती आहे.

अपात्रतेनंतरही भाजपाकडे कल
कमळ चिन्हावर निवडून आलेल्या व पालिकेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या दहा नगरेसवकांवर भाजपने अपात्रतेची याचिका दाखल केली होती. या दहा जणांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र केले. राज्यमंत्र्यांनीही हा निर्णय कायम ठेवला. या अपात्र नगरसेवकांतील दोन जण भाजपच्या गोटात दाखल झाले तर अजून तीन माजी नगरसेवक वाटेवर आहेत. प्रवेशासाठी इच्छूक असलेल्या हे नगरसेवक अपात्र असले तरी भाजपच्या माध्यमातून आगामी निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. अर्थात स्वत: रिंगणात उतरण्याऐवजी ते परीवारातील सदस्यांना भाजपकडून उमेदवारी मिळविण्याच्या तयारीत आहेत.

या कारणाने भाजपमध्ये इनकमिंग
शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा खडसे की चौधरी गटाकडे असेल यावरही आगामी राजकारण अवलंबून राहणार आहे. यापूर्वीच माजी आमदार संतोष चौधरी यांनी बाहेरच्यांचा हस्तक्षेप सहन करणार नाही, असा इशारा दिला आहे. खडसेंसोबत गेलेले नगरसेवक चौधरींचे नेतृत्व मान्य करतील काय? याबाबत शंका आहे. याचा परिणाम भाजपमध्ये होणार्‍या इनकमींगवर होणार आहे. सध्या तरी शहरातील राजकीय गोटात निवडणूकीचे वातावरण नसले तरी निवडणूकपूर्वीच्या राजकिय घडामोडींना वेग आला आहे.