⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

..तर उद्यापासून मातोश्रीवर भांडी घासण्यासाठी जाईल : आ.मंगेश चव्हाण

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांची अधिवेशनात चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘सरकार हरवले आहे’, महाभकास आघाडी, वसुली सरकार धिक्कार असो, निषेध असा मजकूर असलेले कपडेच परिधान करीत आ.मंगेश चव्हाण यांनी आपला निषेध व्यक्त केला. आ.मंगेश चव्हाण नेहमी ‘या ना त्या’ कारणाने चर्चेत असतात. आज त्यांनी थेट अधिवेशनात ठाकरे सरकारचा निषेध करणारे कपडे परिधान करीत प्रवेश केला आणि ठाकरे सरकारविरुद्ध ज्वलंत प्रतिक्रिया दिली.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस असून विरोधक सातत्याने वेगवेगळ्या मुद्यावरून ठाकरे सरकार विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना दिसत आहेत. दरम्यान चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘सरकार हरवलं आहे’ अशा आशयाचा सदरा परिधान करत आगळ्या वेगळ्या अंदाजात ठाकरे सरकार विरोधात रोष प्रकट केला आहे.

आ.मंगेश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, राज्यातील १२ कोटी जनतेच्या प्रश्नांशी सरकारला काहीही देणेघेणे नसून मुख्यमंत्र्यांसह इतर सर्व आपल्या मुलांचे भविष्य सेट करण्यात लागलेले आहेत. माझ्या मतदार संघात ५ वेळा पूर आला, मंत्री येऊन पाहणी करून गेले परंतु अद्याप भरपाई मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांना मी अनेक पत्र पाठविले पण अद्याप उत्तर नाही. मुख्यमंत्र्यांना केवळ आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी १२ कोटी जनतेचे स्वप्न धुळीस मिळवत आहे. मुख्यमंत्र्यांना संघटना चालविणे जमते परंतु राज्य चालविणे जमत नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्यांची नावे सांगून दाखवावी मी उद्यापासून मातोश्रीवर झाडू, भांडी घासण्यासाठी जाईल, असे आव्हान आ.चव्हाण यांनी दिले आहे.

हे देखील वाचा :