⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

चोरीचे सत्र सुरूच; भरदिवसा लांबविल्या २० शेळया

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । जिल्ह्यात शेळया चोरीचे सत्र सुरूच असून बोदवड शहरातील जामठी रोड परिसरातून भरदिवसा ४ शेतकऱ्यांच्या १८ ते २० शेळया चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोदवड शहरातील प्रभाग क्रमांक ८ व ९ मधील जामठी रोड परिसरातून भरदिवसा दुपारी २ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने १८ ते २० शेळया चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. शेख रहीम, इमरान पटवे खलील मन्यार, एकनाथ बोदडे, बाळू माळी यांच्या मालकीच्या या शेळ्या होत्या. शेळी चोरीच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, रात्रीच्या सुमारास एक बुलेटही चोरांनी लांबविली आहे.

शेळ्या चोरीचे सत्र थांबेना
अमळनेर तालुक्यातील गांधली येथील जालंदरनाथ चौधरी यांच्या जळोद रस्त्यावरील शेडमधून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळीने रविवार दि.१७ रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास दरोडा टाकून २ लाख ६३ हजार रुपये किमतीच्या ६३ शेळया चोरून नेल्या. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी रात्री टाकरखेडा (ता.अमळनेर) येथे ज्ञानेश्वर नगराज पाटील यांच्या ७३ हजार रुपय किमतीच्या २२ शेळया व पिले चोरून नेण्यात आल्या. या घटनांचा तपास लागत नाही तोच बोदवड शहरात भरदिवसा २० शेळया चोरून नेण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.