ज्वारीच्या कणसांची चोरी; ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । यावल-चोपडा रस्त्यावरील एका शेतातून ज्वारीची कणसे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी ६ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल येथील बाबुजीपुरा येथील रहिवासी शेख गुलाम रसूल अब्दुल नबी (वय-७०) यांचे चोपडा रोडवरील महाजन पेट्रोल पंपाजवळ शेत आहे. त्यांनी शेतात ज्वारीचे पीक पेरले आहे. दरम्यान, मंगळवार दि.१९ रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास गावातील राजीव वामन कोलते, सुनिल वामन कोलते, गणेश राजू कोलते, बापू वामन कोलते, अरुण राजू कोलते आणि संगीता सुनील कोलते (सर्व रा. यावल) यांनी त्यांच्या शेतातील ज्वारीची कणसे कापून चोरून नेले व जास्त बोलू नका तुम्हाला पण कापून टाकेल अशी धमकी दिली. याप्रकरणी शेख गुलाम रसूल अब्दुल नबी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.