⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

भुसावळात चोरट्यांचा उच्छाद : एकाचवेळी फोडले तीन शॉपींग मॉल, लाखोंचा ऐवज लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । पोलिसांची गस्त भेदून चोरट्यांनी वर्दळीच्या मॉडर्न रोडवरील एकाच रांगेतील तीन दुकानांना टार्गेट करीत चार लाखांच्या रोकडसह नऊ लाखांचा मुद्देमाल लांबवल्याने व्यापार्‍यांच्या गोटात प्रचंड भीती पसरली आहे. शहरातील जुन्या चोर्‍यांसह घरफोड्यांचा तपास लागत नसताना नव्याने होणार्‍या चोर्‍या नागरीकांसह व्यापार्‍यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मॉडर्न रोडवरील हरेकृष्णा मॉल, गुरूनानक क्लॉथ स्टोअर्स व गोपी सुपर शॉपिंग मॉलमध्ये चोरी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर पोलिस यंत्रणेने धाव घेतली.

पोलिस यंत्रणेची धाव
चोरीची माहिती मिळताच प्रभारी डीवायएसपी कुणाल सोनवणे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांनी भेट देत पाहणी केली. हरेकृष्णा मॉल व गुरूनानक दुकानातील कॅमेरे रात्री बंद ठेवण्यात आल्याने त्यात चोरट्यांची छबी कैद होवू शकली नाही मात्र हरेकृष्ण मॉलमध्ये चोरटे सीसीटीव्हीत आले असून त्याद्वारे त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

नऊ लाखांच्या ऐवजावर डल्ला
मॉडर्न रोडवरील हरेकृष्ण मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी चोरट्यांनी छताची पत्रे उचकावत प्रवेश केला. दुकानातून 45 हजारांची रोकड तसेच अन्य साहित्य लांबवण्यात आले. यानंतर गुरूनानक क्लॉथ स्टोअर्समध्ये वरील बाजूने प्रवेश करीत दुकानातील एक लाख 75 हजारांची रोकड लांबवण्यात आली मात्र येथून कपड्यांची चोरी झाली नाही तर गोपी सुपर शॉपिंग मॉलमध्ये वरच्या मजल्यावरील शटर तोडून चोरट्यांनी प्रवेश केला व एक लाख 58 हजार रुपयांची रोकड तसेच तीन लाखांचे महागडे रेडिमेड कपडे सुध्दा चोरून नेले.

गस्त वाढवणार ः व्यापार्‍यांनी सतर्कता बाळगावी
शहरातील चोर्‍यांच्या पार्श्वभूमीवर संशयीतांची चाचपणी सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगाने तपासाला वेग देण्यात आला आहे. व्यापार्‍यांनी रात्रीच्या वेळी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करू नयेत तसेच शक्य असल्यास सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, असे आवाहन बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले आहे.

हे देखील वाचा :