जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. अशातच बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे चोरट्यांनी चार बंद घरे फोडून सुमारे ३५ लाखांचे सोने व रोख ४० हजार रुपये लंपास केले. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून चोऱ्यांचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

नाडगाव येथे राम मंदिराच्या डाव्या बाजूला व मागील असलेल्या बंद घरांना चोरट्यांनी लक्ष केले. या चारही घरांचे मालक बाहेरगावी असल्याने घरे कुलूपबंद होती. यामुळे चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश मिळवला. तेथील सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यात निवृत्त रेल्वे कर्मचारी अशोक झांबरे हे पुणे येथे राहणाऱ्या मुलाकडे गेले होते. त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले.

या दागिन्यांची किंमत सुमारे २५ लाख रुपये आहे. तर पत्नीच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्याने तीन महिन्यांपासून पुण्याला गेलेले निवृत्त रेल्वे कर्मचारी रामदास भंगाळे यांचे बंद घरही चोरट्यांनी फोडले. येथून त्यांनी चार तोळे म्हणजे पाच लाखांचे सोने लंपास केले. कामानिमित्त बुलडाणा येथे गेलेले राजू पाटील यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन सोन्याच्या अंगठ्या व रोख ४० हजार रुपये लांबवले. चोरट्यांनी संगीता पाटील यांच्या घराचे कुलूप तोडले.











