बंद घर फोडून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. दिवसेंदिवस या घटना वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना अमळनेर तालुक्यात समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
अमळनेर तालुक्यातील मांजर्डी येथील सुकलाल भीमराव बिऱ्हाडे हे कुटुंबासह २१ डिसेंबरला सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घर बंद करून धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. लग्न सोहळा आटोपून बिऱ्हाडे कुटुंब २३ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता घरी परत आले, तेव्हा त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसून आले. यावेळी घरात चोरी झाल्याचे उघड झाले.
दरम्यान घरातील किचनमधील धान्याच्या कोठीतील ४० हजार रुपये रोख आणि ९ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम सोन्याचे कर्णफुले, ६ हजार रुपये किमतीचे २ ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र दिसून आले नाही. या प्रकरणी सुकलाल बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घरात झालेल्या चोरीचा तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.