⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

‘शीश महल’ची भुरळ आणि ‘म्युझिक लायटिंग’चे आकर्षण

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील सार्वजनिकी गणेशोत्सव दिवसेंदिवस अधिक आकर्षित होत होता. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नवनवीन उपक्रम राबविले जात होते. नवनवीन प्रयोग केले जात होते. शहरात श्रीराम गणेश मंडळाने १९८० साली सुभाष चौकात साकारलेला शीश महल भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. संपूर्ण काचेने साकारलेल्या गणेश मंडळात प्रवेश केल्यावर भुलभुलैय्याचा अनुभव घेत भाविकांनी दर्शन घेतले.

जळगावातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप आधुनिकतेची देखील सांगड घालत होते. नवनवीन तंत्रज्ञान आणि उपक्रमांचा उपयोग करून भाविकांचे मनोरंजन आणि प्रबोधन कसे होईल यासाठी सर्व प्रयत्नशील होते. सुभाष चौक सराफ बाजार परिसरात व्यापारी सुरेशचंद्र मिश्रिलालजी गांधी उर्फ ढबू शेठ यांच्या पुढाकाराने श्रीराम गणेश मंडळाची स्थापना होत होती.

नेहमी आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीराम गणेश मंडळाने त्याकाळी अमरावतीहुन गणेश मूर्ती आणण्यास सुरुवात केली. अतिशय सुंदर आणि आकर्षक गणेशमूर्ती सर्वांना आपलेसे करीत होती. मंडळाचे प्रमुख सुरेशचंद्र मिश्रिलालजी गांधी उर्फ ढबू शेठ यांच्यासह उमा अबोटी, लच्चू शेठ आणि इतर सहकाऱ्यांसह नवनवीन संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. कृष्ण लीला, रास लीलाची हलणारी आरास देखील त्यांनी साकारली.

सराफ बाजारातील भवानी मंदिरासमोर बसणारे श्रीराम गणेश मंडळाने १९८० साली २५ वर्ष रौप्य महोत्सव जल्लोषात आणि आगळ्या पद्धतीने साजरे करण्यासाठी शीश महल साकारला होता. संपूर्ण काचेचे मंडळ पाहण्यासाठी नाशिक, पुणे, मुंबईसह जळगाव जिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंडळात उभेउभ नटराज रूपातील गणेश मूर्ती ठेवण्यात आली होती.

नवीपेठ हा नव्याने वसलेला परिसर १९८० च्या दशकात होता. नवीपेठेतील नवीपेठ मित्र मंडळ देखील नवनवीन उपक्रम आणि आरास सादर करीत होते. सप्तशृंगी देवी दर्शन, साई दरबार असे अनेक आकर्षक देखावे त्यांनी आजवर सादर केले आहे. १९८० च्या दशकात देशात म्युझिक लायटिंग हा नवीनच प्रकार आला होता. संगीताच्या तालावर नृत्य करणाऱ्या विद्युत रोषणाईचे सर्वांना आकर्षण होते. १९८२ साली नवीपेठ मंडळाने तब्बल ७५ हजार रुपये खर्चून इंदोर येथून म्युझिक लायटिंग आणली.

जळगावात नव्यानेच केलेला हा प्रयोग यशस्वी झाला आणि तेथून पुढे सार्वजनिक गणेशोत्सवाला कलाटणी मिळाली. प्रत्येक मंडळाकडून आधुनिकतेची सांगड घालत नवनवीन उपक्रम आणि आरास सादर केल्या जाऊ लागल्या. जळगाव शहरातील आजवरच्या गणेशोत्सवाची अशीच नवनवीन आणि रंजक माहिती आम्ही दररोज आपल्यासमोर मांडणार आहोत.