⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

चोरट्यांचा उच्छाद.. गांधली येथे तब्बल ९ घर फोडून लांबविला ‘इतक्या’ लाखाचा ऐवज

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२१ । जिल्ह्यात सध्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येतेय. अशात अमळनेर तालुक्यातील गांधली येथे अज्ञात चोरट्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल ९ घरांचे कडी-कोयंडे तोडून दोन घरातून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, धान्य, साड्या असा ३ लाख ३७ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना १२ रोजी पहाटे उघडकीस आली.

गांधली येथील शानुबाई निंबा महाजन यांचे जुने घर बंद होते. त्या जवळच असलेल्या नवीन घरात त्या झोपायला गेल्या होत्या. पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांना जाग आली तेव्हा त्यांना बंद असलेल्या जुन्या घराचा कडी-कोयंडा तोडलेला दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांचे घरात ठेवलेले ५० हजार रुपये रोख, ६० हजार रुपयांचे २० ग्रॅम सोन्याच्या दोन अंगठ्या, ३० हजार रुपयांची सोन्याची चिप, १ हजार रुपयांची ४० किलो दादर असा १ लाख ४१ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले.

तर सुशीलाबाई बाविस्कर ही महिला घरात झोपलेली असताना चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील १ लाख रुपये, ८० हजार रुपयांच्या २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, ३० हजार रुपयांच्या १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, ६ हजारांच्या १५ साड्या असा १ लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. चोरट्यांनी गावातील दत्त मंदिराचाही .दरवाजा तोडून मंदिराच्या दान पेटीतील ५०० रुपये लंपास केले आहेत. तर दानपेटी मंदिराबाहेर फेकून दिली होती.

दरम्यान, एमएसईबी कार्यालय, आत्माराम बुधा चौधरी, शिवाजी मंगा पाटील, दोधू वामन महाजन, सुभाष रतन महाजन, रघुनाथ बळवंत देशमुख यांच्याही घराचे कडी-काेयंडा तोडून चोरी करण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र ते यशस्वी झाले नाहीत. दरम्यान, पोलिस पाटील प्रताप संदानशिव यांनी पोलिस ठाण्यात ही माहिती कळवताच पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम पाटील, दीपक माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला. जळगाव येथून श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना ही पाचारण करण्यात आले हाेते.

हे देखील वाचा :