जळगावात घरफोडीचे सत्र थांबेना! निवृत्त सहायक फौजदाराच्या घरात चोरट्यांची हातसफाई

सप्टेंबर 28, 2024 12:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२४ । जळगाव शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या घटना मोठ्या वाढल्या असून चोरट्यांना खाकीचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसून येत आहे. अशातच आता चोरट्यांनी निवृत्त सहायक फौजदाराच्या घराचे घर फोडून रोख सात हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

gharphodi chori jpg webp

याबाबत असे की, जळगाव शहरातील दादावादी येथील निवृत्त सहायक फौजदार चंद्रकांत माधवराव बडगुजर (६७) हे पत्नीसह १४ सप्टेंबर रोजी रावेर येथे शिक्षक असलेले पंकज बडगुजर या मुलाच्या घरी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातून रोख सात हजार रुपये, ३० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोनपोत, १० हजार रुपये किमतीच्या गणपतीच्या चांदीच्या दोन मूर्ती, चांदीचे लक्ष्मीचे शिक्के, जोडवे, असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

शेजारी राहणाऱ्या महिलेने गुरुवारी (दि. २६) बडगुजर यांच्याशी संपर्क साधून दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. त्यानंतर बडगुजर कुटुंबीय घरी आले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटून ते जिन्याखाली पडलेले दिसले. कपाटात ठेवलेली रोकड व सोन्या-चांदीचे दागिने दिसले नाहीत. याप्रकरणी त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों धनराज पाटील करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now