जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२१ ।यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथे बांधण्यात येत असलेल्या व्यायामशाळेचे काम हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असुन या बांधकामाची वरिष्ठ पातळीवर संपुर्ण चौकशी झाल्या शिवाय संबधीत ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येवू नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
किनगाव खुर्दचे ग्रामस्थ सईद खाटीक यांनी निवेदनात म्हटले आहे की , किनगाव खुर्द या गावात लाखो रुपयांच्या शासकीय निधीतुन व्यायाम शाळेचे बांधकाम गावातीलच एका ठेकेदाराच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. हे काम शासकीय निविदेप्रमाणे होत नसल्याने अत्यंत सुमार व निकृष्ठ प्रतिचे होत आहे. या कामाची चौकशी व्हावी अशी तक्रार केली असुन, शासकीय नियमावलीनुसार ही ईमारत बांधलेली नसल्याने भविष्यात ही व्यायाम शाळेची बांधलेली ईमारत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ही खाटीक यांनी प्रस्तृत प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.
यावल पंचायत समितीचे बांधकाम अभियंता हे तक्रारीची दखल म्हणुन कामास पाहण्यास देखील आले नसल्याने बांधकाम अभीयंता व ठेकेदार यांच्या संगनमताने या परिसरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारची ठेकेदार व बांधकाम अभियंता यांच्या संगनमताने अत्यंत निकृष्ठ प्रतिची कामे करून गावपातळीवर विकासकामांचा देखावा करून सर्रासपणे शासकीय निधीची वाट लावली जात असल्याची अनेक सामाजीक कार्यकर्त्यांची ओरड आहे. यावल पंचायत समितीकडे या विषयी लिखित तक्रारी देखील करण्यात आलेल्या असुन मात्र प्रशासकीय पातळीवर या प्रश्नाकंडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. गटविकास अधिकारी विलास भाटकर यांनी या विषयात विशेष लक्ष घालुन यावल तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची चौकशी करावी, अशीही मागणी होत आहे.