⁠ 
बुधवार, मे 8, 2024

दुकानात आले भामटे, मोबाईल खरेदीचा केला बहाणा, ११ मोबाईलसह काढला पळ

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । मोबाइल खरेदी करण्याचा बहाणा करून १ लाख ६५ हजार रुपयांचे ११ मोबाइल चोरून पलायन केलेल्या पिता-पुत्रास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांच्या आत अटक केली. पोलिस सीसीटीव्ही फुटेजमधून संशयितांपर्यंत पोहोचले. कैलास श्रीबलराम लालवाणी (वय ४८) व त्याचा मुलगा सुमीत कैलास लालवाणी (वय २३, रा. वारसिया परिसर सिंधी कॉलनी, बडोदरा, गुजरात) असे अटक पिता-पुत्राचे नाव आहे.

जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमधील गुरुकृपा मोबाइल केअर या दुकानावर दि.१४ जून रोजी दुपारी दोन वाजता कैलास व त्याचा मुलगा सुमीत दोघे मोबाइल खरेदी करण्याच्या बहाण्याने आले. त्यांनी ११ मोबाइल खरेदीचा बहाणा केला. हे मोबाइल एका बॅगेत ठेवले. मार्केटमधील आणखी काही दुकानांत मोबाइल पाहून येतो असे सांगत त्यांनी बॅग दुकानातच ठेवली. तर स्वत:सोबत एक बॅग घेऊन गेेले. बाहेरून आल्यावर पेमेंट करतो असे सांगून दोघे गेले होते. दुकानात ठेवलेल्या बॅगेत मोबाइल असल्याचा समज दुकानदाराचा झाला होता. त्यामुळे दुकानदार निश्चिंत होते. प्रत्यक्षात दोघांनी दुकानदाराची नजर चुकवून मोबाइल ठेवलेली बॅग सोबत नेली होती. तर दुकानात ठेवलेल्या बॅगेत कपडे व टॉवेल असे साहित्य होते. दुकानदार एका आजारी नातेवाइकाला पाहण्यासाठी रुग्णालयात गेले. तासाभरानंतर परत आले तर दुकानात लालवाणींची बॅग पडून होती. ‘या लोकांचे पेमेंट आले नाही का, ते मोबाइल कधी घेऊन जाणार आहेत’ अशी विचारणा त्यांनी कामावर असलेल्या मुलास केली. बराच वेळ झाला तरी लालवाणी येत नसल्याने अखेर दुकानदाराने बॅग तपासली. त्यात कपडे असल्याचे दिसून आले. खरेदीच्या नावाने आलेल्या दोघांनी मोबाइल चोरून नेल्याची खात्री होताच दुकानदाराने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर दाेघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. या दोघांनी इंदूर, जाेतापूर, अकोला, मुंबई, पुणे, कोटा येथे अशाच प्रकारे मोबाइल चोरी केले असल्याची कबुली दिली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात लालवाणी पिता-पुत्रांची हातचलाखी दिसून आली. दोघेजण रेल्वेने नाशिककडे जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सहायक फौजदार रवी नरवाडे, युनूस शेख, संजय हिवरकर, सुनील दामोदरे, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे यांचे पथक स्थानकावर रवाना केले. या पथकाने लोहमार्ग पोलिस व नाशिकच्या रेल्वे सुरक्षा बलाची मदत घेत बुधवारी पहाटे दोघांना नाशिक स्थानकावरून ताब्यात घेतले. त्यांना शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.