⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

मालिकांचे बदलते विषय प्रेक्षकांना करतात आकर्षित

जळगाव लाईव्ह न्यूज : ४ एप्रिल २०२३ : छोट्या पडद्यावरील कौटुंबिक मालिका किंवा रिॲलिटी शो हे घराघरात पाहिले जाणारे कार्यक्रम आहेत. घरातल्या महिलांचा तो हक्काचा विरंगुळा आहे. काळ बदलत गेला तसे या मालिकांचे विषय, स्वरूप सारेच बदलले. नवनवीन वयोगटाला टार्गेट करत या मालिकांनी आपले स्वरूपच बदलले.


मालिकांचा प्रेक्षक वर्ग हा पूर्वी सीमित होता. वाहिन्या देखील मोजक्याच होत्या. आता वाहिन्यांची संख्या देखील वाढली आहे आणि त्यावरील कार्यक्रमही.


वेब, सिनेमा, नाटक या माध्यमांप्रमाणेच टीव्ही माध्यम देखील ताकदीचं मानलं जात. आता लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयोगटातले स्त्री-पुरुष मालिका बघताना दिसतात. त्यामुळे टीव्ही या माध्यमाचा प्रेक्षकवर्ग वाढलेला आहे असं चित्र आहे. याचं मुख्य कारण म्हणजे मालिकांचे बदलत जाणारे विषय. मालिकांचा साचा एक असला तरी त्यातील विषयांमध्ये वैविध्य आणलं जातंय हे विशेष आहे. याआधी प्रेमकहाणी, कौटुंबिक गोष्ट मांडून त्यातले अनेक पैलू उलगडले जायचे. पण सध्या यासह सामाजिकदृष्ट्या गरजेचे, तसेच वेगळ्या धाटणीचे विषयही उत्तम पद्धतीने हाताळल्याचं समोर येतंय.


डेली सोप म्हणजेच दैनंदिन मालिका प्रेक्षकांच्या आयुष्याचा भाग झाल्यानं त्यातील कलाकारही त्यांच्या घरातलाच एक भाग होतात. त्यामुळे या कलाकार मंडळींकडून पोहोचवला जाणारा संदेश प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच सामाजिक संदेश अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी मालिकाविश्वाचा वापर करून घेतला जातो असल्याचे असं तज्ज्ञ सांगतात. वेगळ्या धाटणीच्या मालिकांनाही चांगला प्रेक्षकवर्ग लाभतोय, असंही निरीक्षण ते नोंदवतात. सध्याच्या काही मालिकांमध्ये नेहमीसारखं कुटुंब, प्रेमकथा, हेवेदावे, कारस्थानं असं सगळं काही आहे. पण त्याचबरोबर मूळ कथा गंभीर, वेगळ्या आणि सामाजिक विषयात गुंफली गेलेली दिसत आहे.
नुकतीच झी मराठी वाहिनीवर एक वेगळाच विषय घेऊन मालिका सुरू झाली आहे. शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारी ही मालिका म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’. या मालिकेची निर्माती शर्मिष्ठा राऊत म्हणते, ‘प्रेक्षकांना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा विषय पाहायला मिळावा या उद्देशानं आम्ही मालिकेची निर्मिती करायचं ठरवलं. शिक्षण आणि पैसा यापैकी कुठलीही एकच गोष्ट महत्त्वाची नसून दोन्हीचा मिलाफ होणं गरजेचं आहे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यातून मनोरंजन व्हावं असा आमचा प्रयत्न आहे. मालिकेची लेखिका मधुगंधा कुलकर्णी, सहनिर्माता तेजस देसाई आणि कल्पक जोशी, स्वप्नील मराठे यांच्यामुळे हा इतका गरजेचा विषय हाताळण्याचं धाडस आम्ही केलं.’


याचसोबत श्वेता शिंदे निर्मित शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करणाऱ्या ‘शेतकरीच नवरा हवा’ या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आम्ही मालिकेतून प्रेक्षकांसमोर फक्त शेतकऱ्यांच्या समस्या नाही; तर त्यातून मार्ग काढण्याची त्यांची जिद्दसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं लेखक स्वप्नील गांगुर्डेनं सांगितलं. ‘शेतकऱ्यांचं होणारं नुकसान, आत्महत्या यापलीकडचं चित्र आम्ही मालिकेत मांडत आहोत. यातून फक्त शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य प्रेक्षकसुद्धा प्रेरणा घेतील, त्यांना बळ मिळेल; या विचारानं हे कथानक मांडायचा आम्ही प्रयत्न केला आहे.तर यातील सयाजीची रांगडी भूमिका आणि त्याची रेवा सोबतची केमिस्ट्री पडद्यावर छान जुळून आली आहे.


‘शुभविवाह’ या मालिकेतून विशेष मुलांच्या विश्वात डोकावण्याची मला संधी मिळाली. समाजात वावरताना त्यांना कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं हे जाणून घेता आलं. त्यांची मानसिकता समजून घेऊन गोष्ट लिहायची असल्यामुळे ते आव्हानात्मक होतं. सामाजिक संदेश, अशा मुलांना हाताळण्याची पद्धत, घरून आणि समाजातून लागणारं पाठबळ आणि त्याच्या जोडीला मनोरंजन यामुळे या विषयावर लिहीणं गरजेचं वाटलं असल्याचे लेखक शिरीष लाटकर यांनी सांगितलं आहे.


तर एक गृहिणी असलेली अश्विनीच्या आयुष्यात अचानक एक मोठं वादळ येऊन तिला घराबाहेर पडाव लागलं. यातून उभं राहिलेलं तीच अश्विनी ब्युटी पार्लरचा प्रवास ते थेट मिसेस इंडियात तिची इंट्री असे अनेक प्रसंग दर्शविताना एका गृहिणीची कहाणी तू चाल पुढं च्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. अनेक अडचणींवर मत करत गणूवरच्या तिच्या विश्वसावर केवळ ती स्वतःची वाट शोधताना दिसतेय किंबहुना ती तीच अस्तित्व निर्माण करतेय. मात्र यात तिच्या घरच्यांना मायेच्या माणसांना ती अजिबात अंतर देत नाही असे वेगळ्या धाटणीचे कथानक या मालिकेच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. तर दोन भिन्न भाषिक व्यक्तींचं प्रेम दर्शवणारी ‘जिवाची होतिया काहिली’ ही मालिका लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील नायक-नायिकेचं प्रेम कुटुंबीय स्वीकारत नसल्यामुळे घडणारं कथानक भिन्न भाषिक, जातीय, धर्मिय व्यक्तींमधलं प्रेम आणि त्याचे परिणाम याचं दर्शन घडवतं. लठ्ठपणावर भाष्य करणारी ‘सुंदरा मनामध्ये भरली’, रंगभेदावर परखडपणे मत मांडणारी ‘रंग माझा वेगळा’ अशा अनेक मालिका सध्या प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरताहेत. तर काँट्रॅक्ट मॅरेज या संकल्पेनवर आधारित ‘ठरलं तर मग’ या मालिकेलाही चांगला प्रतिसाद मिळतोय. आध्यात्मिक विषयांचीही मालिकाविश्वात कमी नाही. या मालिकांना लाभणाऱ्या प्रेक्षकवर्गात आता बच्चेकंपनींचीही भर पडली आहे.


वैविध्यपूर्ण विषय आणत मराठी वाहिन्या मालिकांमध्ये ताजेपणा टिकवण्याचं काम सातत्यानं करताहेत. रहस्यमय, रोमांचक, ऐतिहासिक, आध्यात्मिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारित मालिका सध्या सुरू आहेत. प्राइम टाइममधील मालिकांचा ठरलेला साचा मोडून वेगळा विषय हाताळण्याच्या या प्रयोगाला प्रेक्षकांची दाद मिळतेय हे विशेष.