⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

एकत्रित समाज हाच फुले यांचा राष्ट्रवाद होता – डॉ.श्रीमंत कोकाटे

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या महात्मा फुले यांच्या विचाराचा प्रभाव शैक्षणिक, सामाजिक, कृषी, तंत्रज्ञान, स्त्रीवाद या क्षेत्रात आजही कायम असून एकत्रित समाज हाच फुले यांचा राष्ट्रवाद होता असे प्रतिपादन इतिहासकार डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी मंचावर प्रभारी कुलसचिव प्रा.के.एफ.पवार उपस्थित होते. डॉ. कोकाटे यांनी “महात्मा फुले यांच्या विचार कार्याचा विविध समाज समुहावरील प्रभाव ” या विषयावर आपले विचार मांडले. ते म्हणाले की, ज्या महाराष्ट्रात छत्रपतींना शिक्षण घेण्यावर बंदी होती त्या ठिकाणी शुद्रातीशुद्र, कष्टकरी वर्गाला शिक्षण मिळावे म्हणून महात्मा फुले यांनी मुलींची आणि त्या नतर मुलांची शाळा सुरु केली. महात्मा फुले यांच्या जाणिवेतच नव्हे तर नेणीवेतही स्त्रियांविषयी आदर होता. महिलांना सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा आरंभ फुलेंनी करुन दिला. फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव इतर राज्यातही पडला. सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, भास्करराव जाधव, जेधे, जवळकर, पंजाबराव देशमुख, कर्मवीर जगदाळे आदींवर महात्मा फुलेंचा प्रभाव होता आणि त्यांनी त्या त्या क्षेत्रात तो विचार पुढे नेला. कष्टकरी आणि श्रमिकांची भाषा महात्मा फुले यांनी साहित्यात आणली. नाभिकांची चळवळ उभी केली. जात, धर्म, पंथ, संप्रदाय या पुरता त्यांचा राष्ट्रवाद सिमित नव्हता. आपण सगळे माणूस म्हणून एक आहोत. अशी त्यांची राष्ट्रवादाची व्याख्या होती. ते बुध्दी प्रामाण्यवादी होते. त्यांचा विचाराचा प्रभाव आजही कायम आहे असे डॉ.कोकाटे म्हणाले.

        अध्यक्षीय भाषणात प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी सशक्त राष्ट्र निर्मितीच्या योगदानासाठी महापुरुषांच्या विचारांवर  चालण्याची गरज आहे.  शिक्षण, रोजगार आणि स्वाभिमानाने जगण्याचे अधिकार जो पर्यंत मिळत नाही तोपर्यंत भारत विश्वगुरु होऊ शकणार नाही.  त्यामुळे विखुरलेपण विसरुन एकत्र येण्याची गरज आहे. प्रतिक्रिये ऐवजी प्रतिसाद दिला जावा असे आवाहनही त्यांनी केले.  उदघाटकीय भाषणात डॉ. अभिजीत राऊत यांनी वैचारिक चळवळीच्या अधिष्ठानाचा उगम विद्यापीठांमधून होत असतो.  त्यामुळे अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे स्पष्ट केले.  प्रारंभी प्रा.म.सु.पगारे यांनी महोत्सवाची भूमिका विशद करतांना महापुरुषांच्या विचारांचे अनुयायी निर्माण व्हावेत यासाठी हा महोत्सव असल्याचे सांगितले. या समारंभात प्रा.म.सु.पगारे यांच्या “महात्मा फुले:लिटरेचर ॲण्ड इटस सेाशल इम्पॅक्ट ” या इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन अतिथींच्या हस्ते झाले.  भालचंद्र सामुद्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ.अनिल डोंगरे यांनी आभार मानले. विद्यापीठ, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, विचारधारा प्रशाळा, डॉ.आंबेडकर विचारधारा विभाग, बुध्दीस्ट आणि महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मागासवर्गीय कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा जयंती महोत्सव घेतला जात आहे.  उद्या दि.१२ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांचे “आंबेडकरवादी चळवळीचे विविध आयाम आणि आव्हाने” या विषयावर सिनेट सभागृहात सकाळी १०.३० वाजता व्याख्यान होणार आहे.  पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे प्रमुख अतिथी असून प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे अध्यक्षस्थानी असतील.