⁠ 
सोमवार, मे 6, 2024

गट रचनेवरच ठरणार इच्छुकांची व्यूह रचना

जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची मुदत मार्चमध्ये संपणार आहे. त्यामुळे अगामी निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. नव्याने गट व गणांची रचना झाल्यानंतर गट रचनेवरच सदस्यांची राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. नव्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या रचनेत कुठल्या भागाचा समावेश होणार आहे किंवा कुठल्या गटात कुठले गाव जाणार आहे? विद्यमान सदस्यांची गाव नव्या गट रचनेत राहणार की नाही ? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

त्यातच तालुक्यांमध्ये गट रचनेत होणार्‍या बदलात आपले गाव दुसर्‍या गटात जाते की काय अशी धास्ती विद्यमान सदस्यांना लागली आहे. विद्यमान सदस्यांनी आपल्या गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यामुळे नव्याने होणार्‍या जिल्हा परिषद गट रचनेच्या व्यूहरचनेवरच सदस्यांची राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जागा वाढवण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेचे दहा गट तर पंचायत सामिरीचे वीस गण वाढणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणाऱ्या इच्छुकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

जागांनुसारच ठरणार रणनीती

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी निवडणुकीत या जागा वाढणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील समीकरणांमध्ये मोठा बदल होणार आहे. या वाढलेल्या जागांनुसार राजकीय पक्षांना आपली रणनीती ठरवावी लागणार आहे. तर सर्वच राजकीय पक्षांना नव्याने वाढ होणाऱ्या गट व गणात आपलीच सरशी कशी होईल याची व्यूहरचना तयार केली जात आहे.

मोर्चेबांधणीला सुरवात

राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी आपापले गट आणि गणांमध्ये मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या स्वरूपांचे कच्चे आराखडे तयार करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्याने आतापासूनच मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीचे रंग भरू लागले आहेत. इच्छुकांनी आतापासूनच गट-गणात संपर्क वाढवण्यास सुरवात केली आहे. गावोगावी विकासकामांचे भूमिपूजन करण्यासह प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याच्यादृष्टीने राजकीय पक्षांच्या नेत्यांसह इच्छुक उमेदवारांकडून गावोगावच्या ग्रामस्थांच्या बैठका घेण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर इच्छुकांचा प्रचाराची सुरवात झाली आहे. काहींनी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्यास अपक्षही उमेदवार म्हणूनही लढण्याची तयारी सुरू केली आहे.

इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष

कोणते आरक्षण पडणार? कोणत्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये कोणते आरक्षण पडणार? याबाबतचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी, मागील दोन निवडणुकीच्यावेळचे आरक्षण लक्षात घेऊन पुढील म्हणजे संभाव्य आरक्षणाचे इच्छुक उमेदवारांकडून आराखडे बांधले असून इच्छुकांनी आपापल्या मतदार संघात मोंर्चेबांधणी सुरू केली आहे.

हे देखील वाचा :