⁠ 
रविवार, मे 19, 2024

दुष्काळात तेरावा महिना! रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ.. नवीन दर पहा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२४ । सततच्या दुष्काळामुळे आधीच शेतकरी राजा त्रस्त असून यातच आता रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. मिश्र खते, सुपर फास्फेट, पोटॅश यांच्या भावात वाढ झाली. दरम्यान, आगामी खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खते महागल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यात आता खरीप पेरणी करायची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. खरिपाची पेरणी जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच खतांची खरेदी होते. मात्र, त्यापूर्वी खतांच्या दरवाढीचे नवे संकट ओढविले आहे. भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे खरिपाचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

आधीच डिझेल दरवाढ झाल्याने ट्रॅक्टरमार्फत होणाऱ्या आंतरमशागतीचा खर्च वाढला आहे. प्रति एकर दोन ते तीनशे रुपयांपर्यंत नांगरणीचा खर्च वाढला असून, २००० ते २२०० रुपये प्रति एकर नांगरणी झाली आहे खते, बियाणे, रोजगार आणि मशागतीसाठी लागणारे यंत्र याच्या बाजारभावात नियमित वाढच होत आहेत. मात्र, शेतमालाचे बाजारभाव स्थिर आणि घटताच आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचे बाजारभाव पाच हजारांभोवतीच आहेत. सद्यःस्थितीत तर ४ हजार ६०० रुपये भाव मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतमालाचे बाजार भाव घटणारे आणि खर्च मात्र वाढतच असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचे चित्र आहे

वाढलेले खत दर..
खताचे नाव जुने दर नवे दर
१०-२६-२६ १४७० १७००
२०-२०-०-१३ १२५० १४००
२४-२४-० १५५० १७००
सुपर ५०० ५५०

शेतकरी म्हणतात..
उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात मात्र घट होत आहे. यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकयांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. उत्पादन खर्चात सर्वात महत्त्वाचा घटक असणाऱ्या खताच्या भावातच वाढ होत असल्याने शेती क्षेत्र आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही असे शेतकरी म्हणत आहेत.