गोष्ट एका लग्नाची.. ७५ वर्षीय ‘वर’, ६६ वर्षीय ‘वधू’
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । किनगाव (ता.यावल) येथील ७५ वर्षीय वर आणि जामनेर येथील ६६ वर्षीय वधू असा आगळावेगळा विवाह रविवार दि.१७ रोजी जामनेर येथे पार पडला. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा शहरात रंगली आहे. या विवाह सोहळ्याला त्यांची मुले, जावई व नातवंडे उपस्थित होती.
यावल तालुक्यातील किनगाव येथील पुंडलिक तायडे यांच्या पत्नी वत्सला तायडे यांचे काही वर्षांपुर्वी निधन झाले आहे. तायडे यांना दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे आहेत. त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी वास्तव्यास आहेत. वडीलांनी आपल्याकडे राहायला यावे असा मुलांचा आग्रह आहे. मात्र पुंडलिक तायडे यांना गावाची ओढ असल्याने ते किनगाव सोडायला तयार नाहीत. तर दुसरीकडे जामनेरातील चंद्रभागाबाई सुरळकर यांना देखील वैधव्य आले आहे. मुलबाळ नसल्याने त्या एकाकी जीवन जगत होत्या. अशा दोघा ज्येष्ठांचा विवाह सोहळा जामनेरातील संत रोहिदास महाराज मंदिरात रविवारी पार पडला.
पुंडलिक तायडे व चंद्रभागा सुरळकर हे दोन्ही वारकरी आहेत. दोघेही आपापल्या गावातील वारकऱ्यांसोबत दरवर्षी न चुकता मुक्ताईच्या वारीला जात असतात. तेथे दोघांची ओळख झाली. उतारवयात हक्काचा साथीदार असावा म्हणून दोघांच्या विवाहाचा प्रस्ताव जामनेरातील वारकरी सिंधूताई सपकाळ यांनी ठेवला. या प्रस्तावाला अन्य वारकऱ्यांनीदेखील पाठबळ दिले. दोघांनीही आपापले कुटुंबिय व नातेवाईकांशी चर्चा करून विवाहाचा निर्णय घेतला. या विवाह सोहळ्याला त्यांची मुले, जावई व नातवंडे उपस्थित होते.