गिरणा धरणाचा साठा यंदा एक टक्क्याने अधिक, चाळीसगावसह ‘या’ तीन तालुक्यांना मोठा दिलासा
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । जिल्ह्यातील १३५ गावांसाठी संजीवनी असलेल्या गिरणा धरणाची स्थिती समाधानकारक आहे. चणकापूर, ठेंगोडा व पुणंद या धरणांमधून सध्या २३ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने, गिरणा धरणाचा साठा गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या जुलैत एक टक्क्याने अधिक आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात गिरणा धरणाचा साठा ३३.४७ टक्के होता, तो यंदा ३४.४१ टक्के आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी हेमंत पाटील यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे गिरणा धरणाचा साठा हळूहळू वाढत आहे. त्यामुळे यंदाही धरण शंभरी गाठेल अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत सात वेळा हे धरण शंभर टक्के भरले आहे. गिरणा धरण नाशिक जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असले तरी याचा सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होतो. या धरणात तीस टक्के जलसाठा असला तरी, जळगाव जिल्ह्यातील गावांचा पाणीप्रश्न सुटतो. तसेच मालेगाव महानगरपालिका, नांदगाव ५६ गावांची पाणीयोजना, दहिवाळ पाणीपुरवठा योजनेसह चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा, अमळनेर या तालुक्यांना सिंचनासाठी पाणी मिळते. त्यामुळे साठा समाधानकारक असल्याने या तालुक्यांना दिलासा आहे.
नाशिक क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आणि चणकापूर, हरणबारी, ठेंगोडा व पुणंद या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू राहिल्यास जामदा उजवा व डाव्या कालव्यातून पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे विहिरी व कुपनलिकांची पातळी वाढू शकेल.
गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात आवक वाढली अाहे. सध्या चणकापूर धरणातून २३ हजार ६६५ क्युसेस, पुणंद-८,८२९ क्युसेस व ठेंगोडा बंधाऱ्यातून २६ हजार ९००क्युसेस प्रमाणे विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरु झाला आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास आवक वाढून धरणाची पातळी वाढण्याची शक्यता आहे.
गिरणा धरणात सध्या ३४.४१ टक्के साठा असून, त्यात वाढ होत आहे.