⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

महाराष्ट्रातील आमदारांना मिळणारा पगार अन् भत्ता किती? माहिती अधिकारातून आकडा आला समोर

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२३ । खासदार आणि आमदारांना मिळणाऱ्या पगाराबाबत नेहमीच चर्चा होत असते. महाराष्ट्रातील आमदारांना किती वेतन मिळते हा विषय चर्चेला येणे स्वाभाविक आहे. अशातच एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या माहितीत आमदारांच्या वेतनाचा आकडा समोर आला आहे. तो पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथे राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत नेवगी यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. याबाबत महाराष्ट्र विधिमंडळाकडून त्यांना माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्याला २ लाख ७१ हजार ९४७ रुपये एवढे निव्वळ एकूण वेतन आयकर वजा करून देण्यात येत असल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.

image 2
महाराष्ट्रातील आमदारांना मिळणारा पगार अन् भत्ता किती? माहिती अधिकारातून आकडा आला समोर 1

या माहितीत विधानसभेच्या विद्यमान सदस्यांना देण्यात येणाऱ्या एकूण वेतनामध्ये मूळ वेतन १ लाख ८२ हजार २०० रुपये, महागाई भत्ता ३४ टक्के असून तो ६९ हजार ९४८ रुपये, दूरध्वनी सुविधा भत्ता ८ हजार रुपये, स्टेशनरी आणि टपाल सुविधा भत्ता १० हजार रुपये, संगणक चालक सेवा मिळण्यासाठी भत्ता १० हजार रुपये अशी एकूण २ लाख ७२ हजार १४८ रक्कम त्यात अन्य दोन किरकोळ भत्ते मिळून विधानसभा सदस्याला निव्वळ एकूण वेतन २ लाख ७२ हजार ९४७ रुपये मिळत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आमदारांना दूरध्वनीसाठी आठ हजार रुपये मिळतात.

आधीच महाराष्ट्रात कर्जात बुडत चालला आहे. त्यात जुन्या पेन्शन योजनेवरून कर्मचारी संपावर गेला आहे. मात्र दुसरीकडे आमदारांच्या वेतनावर होणारा खर्च किती तरी कोटीच्या घरात केला जात आहे. राज्यातील अनेक आमदार करोडपती आहेत. तरीही स्वतःला लोकसेवक म्हणून घेणारे हे वेगवेगळ्या पक्षाचे कोट्यधीश आमदार स्वतःचा पगार आणि पेन्शन वाढवण्यासाठी विधिमंडळात सरकारवर दबाव आणताना दिसतात. हाच दबाव त्यांनी लोकांची विकास काम व्हावी यासाठी आणला तर जनतेमध्ये आपल्या आमदारांबद्दलचा आदर निश्चितच वाढेल. मात्र याला काही आमदार अपवाद मात्र निश्चितच आहेत.