⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ‘डबल’ची पोलिसांनी काढली धिंड

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ‘डबल’ची पोलिसांनी काढली धिंड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२२ । शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेंदालाल मील परिसरात घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसांशी हुज्जत घालून त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला होता. पोलिसांनी संशयिताला अटक केल्यानंतर शुक्रवारी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांवर हल्ला केल्याप्रकरणी आरोपीची राहत्या घरापासून गेंदालाल मील परिसरातून धिंड काढली. जुबेर उर्फ डबल भिकन शेख (वय-२५) रा. गेंदालाल मील, जळगाव असे आरोपीचे नाव आहे.

घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी जुबेर उर्फ डबल भिकन शेख याच्या घरी बुधवारी ३० मार्च रोजी मध्यरात्री शहर पोलीस कर्मचारी गेले. डबलच्या घरी पोलीस आल्यानंतर कुत्रे भुंकायला लागल्याने डबलला चाहूल लागली. पोलीसांच्या हाती लागू नये म्हणून शेजारी राहणाऱ्या अफसरबेग नूरबेग उर्फ कालू यांच्या घरात घुसला. त्यावेळी पोलीसांना धमकी देवून माझ्याजवळ येवू नका नाही तर स्वत:ला मारून ठाकेन अशी धमकी दिली.

गच्चीवर जावून पोलीसांच्या अंगावर गॅस सिलेंडर फेकले, सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. आणि जुबेरने उडी मारताच पोलीसांनी त्याला पकडले. जुबेरला पकडताच त्याची आई मुमताजबी व भाऊ फारुख यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मुमताजने पोलीस कर्मचारी प्रफुल्ल धांडे यांच्या पाठीला चावा घेत त्यांना जखमी केले. नंतर त्याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीसांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात प्रफुल्ल धांडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी डबलला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर तपासकामी गेलेल्या पोलिसांनी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास आरोपी जुबेर उर्फ डबल याची याची हातात बेड्या ठोकून राहत्या घरापासून गेंदालाल मिल परिसर आणि शिवाजी नगरातील मुख्य रस्त्यापर्यंत धिंड काढली. अश्या गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी अशीच धिंड काढवी जेणे करून इतर गुन्हेगार गुन्हे करण्यापासून परावृत्त होतील अशी प्रतिक्रिया नागरीकांकडून केली जात होते.

पोलिसांनी तपास करून धिंड काढताना सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर, विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, प्रफुल्ल धांडे, नरेंद्र ठाकरे, प्रणेश ठाकूर, रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंधाटे, योगेश पाटील, राजकुमार चव्हाण यांची उपस्थिती होती.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.