⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

दुकान फोडणाऱ्या संशयित चोरट्याला पोलिसांनी केली अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । पाळधी येथील एका पत्र्याचे दुकान फोडून मोबाईलसह इतर वस्तू लांबविणाऱ्या संशयित चोरट्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भडगाव तालुक्यातील कजगाव येथून अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल जप्त करण्यात आला आहे. मिथुनसिंग मायासिंग बावरी (वय-३२) रा. कजगाव ता. भडगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील एका पत्राचे दुकान फोडून दुकानातून मोबाईल व इतर वस्तू चोरी केल्याचे घटना घडली होती. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपीने चोरी केलेला मोबाईल वापरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना पथकाला दिल्या. पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, रणजीत पाटील, किशोर राठोड, विनोद पाटील, मुरलीधर बारी अशा पथकाला तयार करून भडगाव तालुक्यातील कजगाव येथे रवाना केले. रविवारी 13 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता संशयित आरोपी मिथुनसिंग मायासिंग बावरी (वय-३२) रा. कजगाव याला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल हस्तगत केला आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.