⁠ 
शनिवार, मे 18, 2024

सर्व समाजमनांत सावित्रीबाईंचे कार्य रुजविणे ही काळाची गरज : दिपक पटवे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । शिक्षणाच्या पलीकडे एक नवा समाजमनाला भान आणणारा विचार माणसाला माणसाच्या जवळ आणत माणुसकी धर्म जोपासत भारतीय धर्मव्यवस्थेला एक नवा आयाम देणार्‍या फुले दाम्पत्याचा विचार समाजमनात रुजविताना विशेषतः काळाच्या पल्याड विचार करणारा सावित्रीमाई फुलेंचा, त्यांच्या कार्याचा विचार सर्व जाती-धर्मांत, समाजमनात रुजविणे काळाची गरज आहे, असे मत ‘दिव्य मराठी’चे संपादक दीपक पटवे यांनी व्यक्त केले.

सत्यशोधकी साहित्य परिषद, अथर्व पब्लिकेशन्स व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी यांच्यातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम अथर्व पब्लिकेशन्सच्या शाहूनगरमधील कार्यालयात सायंकाळी झाला. प्रा. डॉ. के. के. अहिरे अध्यक्षस्थानी होते, त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कवी व साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल, महापालिकेचे प्रभाग समिती सभापती डॉ. सचिन पाटील, उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे, विजयकुमार मौर्य, अथर्व पब्लिकेशन्सचे संचालक युवराज माळी, कुमुद पब्लिकेशन्सच्या संचालिका संगीता माळी, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पटवे म्हणाले की, विधवा महिलांचे जीवन एका वेगळ्या अर्थाने जगण्याची दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून सावित्रीबाईंचे कार्य महत्त्वपूर्ण आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने सकारात्मक विचार रुजविणारे होते. आपल्या कार्यात कोणत्याही जाती-धर्माचा अथवा कोणत्याही व्यक्तीचा अविचार मनात न आणता अविरत कार्य करणार्‍या सावित्रीमाई भारताच्या आदर्शवत अशा व्यक्तिमत्त्व होत्या.

याप्रसंगी डॉ. बागूल म्हणाले की, सावित्रीमाईंनी समाजसुधारणाचा घेतलेला वसा निश्चितपणे आजच्या स्त्रियांनी अंगीकारल्यास एक विज्ञानवादी समाजव्यवस्था निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.
डॉ. अहिरे यांनी सांगितले की, सावित्रीमाई आणि महात्मा जोतीराव फुले या महान व्यक्तिमत्त्वांनी समाजातल्या अनिष्ट रूढी-परंपरांना छेद देत एक विज्ञानवादी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. याप्रसंगी लुल्हे यांनी सावित्रीबाईंच्या जीवनसंघर्षावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला दीपक साळुंखे, गिरीश चौगावकर, शरद महाजन, सुनील पाटील, सुनील महाजन, सगीर शेख आदींसह कवी, साहित्यिक उपस्थित होते. लुल्हे यांनी प्रास्ताविक केले. बापूराव पानपाटील यांनी सूत्रसंचालन केले. संगीता माळी यांनी आभार मानले.

हे देखील वाचा :