⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

ज्येष्ठ साहित्यिक, कवी ना. धों. महानोर यांना मान्यवरांनी वाहिली श्रध्दांजली

जळगाव लाईव्ह न्यूज | ३ ऑगस्ट २०२३ | ज्येष्ठ साहित्यिक व कवी ना. धो. महानोर यांचं आज सकाळी निधन झालं. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. ते ८१ वर्षांचे होते. महानोर यांनी काव्यसंग्रहांबरोबरच अनेक चित्रपटांसाठीही गीते लिहिली. त्यांच्या या गीतांना त्यांच्या कवितांप्रमाणेच मराठी प्रेक्षकांची पसंती मिळाली. शुक्रवारी पळसखेड या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून श्रध्दांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजप नेते विनोद तावडे, राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी श्रध्दांजली वाहिली आहे.

शरद पवार, राष्ट्रवादी अध्यक्ष

माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले.
ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत.
ना. धो. खूपच हळवे , त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.

नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व वेदनादायी आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. महानोर यांचे जाणे ही साहित्य विश्वाची मोठी हानी आहे. तरल काव्यातून निसर्गाचं हुबेहूब दर्शन घडवण्याची ताकद त्यांच्या लेखणीत होती. त्यांच्या कवितांनी बालकवी, बहिणाबाई यांचा वारसा समृद्ध केला. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती.

राज ठाकरे

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, ना.धो. महानोर ह्यांचं आज निधन झालं. बहिणाबाई चौधरी आणि बालकवी ह्यांच्या कवितेचा वारसा ना.धो. नी समृद्ध केला. महाराष्ट्राचं निसर्गभान ना.धो. महानोरांनी महाराष्ट्राचं निसर्गभान जागृत केलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. नभ उतरू आलं.’ ‘आम्ही ठाकर ठाकर’ ‘घन ओथंबून येती’, ‘चिंब पावसानं रान झालं’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ ही आणि अशी अनेक ना.धों. महानोरांची गीतं महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. २०१९ ला माझ्या एका भाषणानंतर ना.धो. नी मला एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी जे लिहिलं होतं, ती माझ्या आयुष्यात मला मिळालेली मोठी पोचपावती.ना.धो. महानोरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे

निसर्गातील चैतन्याचे गान मांडणारे, मातीशी नाळ घट्ट जोडून आभाळाला गवसणी घालणारे रानकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने मातीचे गीत गाणारा अस्सल माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे.
अक्षरे आणि मातीचे नाते, जोडलेपण आपल्या लेखणीतून मांडून त्यांनी अक्षरश: कवितेचे अंकुर फुलवले. त्यांच्या साहित्यकृतींना मातीचा अस्सल गंध होता. राज्य सरकारचा कृषीभूषण आणि केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. महानोर यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. या वेदनादायी प्रसंगातून सावरण्यासाठी कुटुंबीयांना ईश्वर बळ देवो, अशी प्रार्थना करतो.

उध्दव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

निसर्गाशी एकरूप राहून ज्यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर साहित्य विश्वाला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं, ज्यांच्या साहित्यात आपल्याला निसर्ग विविध रूपांनी भेटला, मनाला भुरळ घालणारी रानगाणी ज्यांच्या लेखणीने अजरामर केली ते ज्येष्ठ लेखक, ‘निसर्गकवी‘ ना. धों. महानोर! त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ही मातीच्या हरवलेल्या सुगंधासारखी आहे. रसिकांची निसर्गाशी नाळ जोडणाऱ्या ह्या रानकवीस भावपूर्ण श्रद्धांजली!

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या निधनाने रसिक मनाला रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला आहे. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
ना. धों. महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसवला. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाने मराठी माणसावर गारूड केलं. लोकसाहित्यावर त्यांनी अलोट प्रेम केले. त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेली गीते मनाचा ठाव घेणारी आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक थोर साहित्यिक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना..

अजित पवार, उपमुख्यमंत्री

ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या ‘रानातल्या कवितां’नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी’ यांसारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्यक्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलं. निसर्गकवी म्हणून वावरताना निसर्गाची काळजीही घेतली. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातल्या कार्याबद्दल ते ‘वनश्री’ पुरस्कारानं सन्मानित होते. राज्य शासनाच्या ‘कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराचे मानकरी ठरले होते. शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधिमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पवार कुटुंबियांनी घनिष्ठ मित्र गमावला आहे. महानोर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. ना. धों. महानोर साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो.

विनोद तावडे, भाजप नेते

ना. धों. महानोर यांच्या निधनाने निसर्गाच्या मूक संवादाला शब्दरूप देणारे कवी आपण गमावले आहेत. आपल्या कवितांमधून आणि लेखनातून निसर्गाचे भान आणि ग्रामीण संवेदनशीलता प्रभावीपणे मांडत त्यांनी स्वतःचे वेगळे साहित्य निर्माण केले. लोकगीतांचा वारसा सांगणारी त्यांची गीते अजरामर आहेत. आज त्यांच्या जाण्याने मराठी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही प्रार्थना!
ओम शांती।

आमदार एकनाथ खडसे, राष्ट्रवादी नेते

महाराष्ट्राला पडलेलं एक सुरेख निसर्गस्वप्न अशी ओळख करून दिली जाणारे ज्येष्ठ कवी, महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सदस्य #पद्मश्री ना धों महानोर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या दुःखद निधनाने साहित्य क्षेत्रातील बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध कऱणारे कवी हरपले आहेत. भावपूर्ण श्रध्दांजली !

अशोकभाऊ जैन

महाराष्ट्राचे निसर्गकवी, प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख असलेले जेष्ठ कवी पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित ना.धों.महानोर यांच्या रूपाने एका प्रतिभाशाली आणि आपल्या शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा कवी आणि भूमिपुत्र हरपला याचे अतीव दुःख आहे. दोन वेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांनी काम केले होते, ते पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जात तसेच हायटेक ऍग्री कल्चर शेतीचे ते पुरस्कर्ते होते. आमच्या परिवाराचे जेष्ठ सदस्य असलेल्या महानोर दादांना आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली

डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार, काँग्रेस

ना. धों. महानोर यांच्या ‘रानातल्या कवितां’ना खरा मातीचा गंध यायचा. त्यांच्या गीतांमधून-कवितांमधून निसर्गाचं खर्‍या अर्थाने दर्शन घडायचं. त्यांनी जशी निसर्गाची वर्णन करणारी गीतं लिहिली, तशा ठसकेबाज लावण्याही लिहिल्या.आम्ही ठाकर ठाकर, चिंब पावसानं रान झालं आबादानी, नभ उतरू आलं, जांबुळ पिकल्या झाडाखाली, जाई जुईचा गंध, किती जीवाला राखायचं, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती अशी एकाहून एक सर गाणी ना.धों. महानोर यांनी लिहिली. आपल्या काव्यलेखनाला त्यांनी प्रत्यक्ष कृतीची जोड दिली. त्यातून आपल्या गावी पळसखेड्याला शेतीचे विविध प्रयोगही केले. त्यामुळेच सरकार कुठलंही असो, त्यांचं लक्ष कृषिधोरणाकडे असायचे. साहित्य सम्राट क्षेत्रातील हिरा असलेले ना. धो. महानोर आज आपल्यातुन हिरावून गेल्याने त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना.