जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा – खान्देश येथील मूळचे नांदेड-साळवा(नासा) गावातील रहिवाशीआणि सध्या पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक असलेल्या ५०० हून अधिक रहिवाशांनी एकत्र येत नासा स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे केले. विशेष म्हणजे, हे कोणत्याही शाळेच्या बॅचसाठी किंवा विशिष्ट उद्देशाने आयोजित नव्हते, तर फक्त आणि फक्त गावावरील प्रेमापोटी सर्वजण एकत्र आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने स्वागताने झाली. गावातील जुन्या आठवणींना उजाळा देत, नवीन पिढीला गावाच्या संस्कृतीची ओळख करून देण्याचा हा उत्तम प्रयत्न होता. अतिशय कमी वेळात नियोजनबद्ध आणि यशस्वीरीत्या हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाने सिद्ध केले की, जरी आपण स्मार्ट सिटीमध्ये राहत असलो, तरी आपली नाळ गावाशी घट्ट जुळलेली आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नासा मित्र मंडळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली. विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.भोजन व्यवस्थाही विशेष आकर्षण ठरली. भरीत पुरी आणि कढी अश्या खान्देशी भोजनाचा उपस्थित सर्वांनी आस्वाद घेतला.
याच निमित्ताने नांदेड-साळवा गावातील जेष्ठ नागरिक आणि गावाचे जावई यांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहण्यात आली. या सत्कार समारंभाने संपूर्ण सभागृहात भावनिक आणि अभिमानास्पद वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्वयंसेवक, आयोजक आणि सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. संपूर्ण नासा कुटुंबाने यानंतर २०२६ साठी आणखी मोठ्या प्रमाणात स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा संकल्प केला आहे.