धक्कादायक : बदनामीच्या भीतीने अल्पवयीन मुलीने सोडले घर

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । एका सोशल साइटवर आक्षेपार्ह फोटो अपलोड झाल्यामुळे बदनामी होईल या भीतीने शहरातील एका १७ वर्षीय तरुणीने घर सोडले. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल साईटवर अपलोड झाले होते. बदनामीच्या भितीपोटी मुलीने घर सोडले. मुलीच्या कुटुंबियांनी शोध घेतला असता ती मिळून आली नाही. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी घरातून निघून गेली किंवा तिला कुणी तरी फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.