जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२३ । दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून राज्य सरकारने दुधाचा किमान दर निश्चित केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला आता 34 रुपये दर देण्याचे निश्चित केले आहे. शासनाने आदेश काढल्याची माहिती दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

दरम्यान, जी दूध डेअरी गायीच्या दुधाला 34 रुपयांपेक्षा कमी दर देईल त्या दूध डेअरीवर आता कारवाई होणार आहे. दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले हा निर्णय सहकारी सह खाजगी दूध संघांनाही लागू करण्यात आला आहे.
प्रत्येक तीन महिन्यांनी दूध दराबाबत आढावा घेतला जाईल. दरम्यान दूध भेसळखोरांना मोक्का लावण्यासह कठोर कारवाई करणार असल्याचेही विखे-पाटील यांनी नमूद केले. दरम्यान पशुखाद्याच्या दरातही पंचवीस टक्के कपात करण्याच्या संबंधित कंपन्यांना सूचना केल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. ते म्हणाले पशुखाद्याच्या गोंण्यावर घटकांचा उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे.