⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

महापौरांनी मांडली जिल्हाधिकाऱ्यांसमोर जळगावची गाऱ्हाणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । जळगाव शहरातील मनपा हद्दीत येणाऱ्या सार्वजनीक बांधकाम विभागाचे ८ रस्त्यांची काम अजून सुरु झालेली नाहीत. अश्या वेळी नागरिकांचे हाल होत असून यामुळे नागरीकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे. अश्यावेळी काहीही चूक नसताना जळगाव शहरातील लोकप्रतिनिधीनीं का म्हणून नागरिकांचा रोष सहन करावा ? आणि कामात दिरंगाई करत असलेल्या ठेकेदारावर प्रशासन कोणतीही कारवाई का करत नाही ? असा सवाल विचारात महापौर जयश्री महाजन यांनी नागरिकांची गाऱ्हाणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या पुढे मांडली.

शहरातील मुख्य रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि नागरिकांचा होत असलेला आक्रोश पाहता सार्वजनिक बांधकाम विभाग या अंतर्गत येणार्‍या प्रमुख रस्त्यांची डागडुजी करुन खड्डे बुजविण्यासंदर्भातही महापौर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना विनंती केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी लवकरात लवकर संबंधित मक्तेदाराला सूचना देऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले. याप्रसंगी जळगाव शहर महानगरपालिकेचे शहर अभियंता एम.जी.गिरगावकर, नगर रचनाकार करवंदे, शकील शेख, सोनगिरे आदी अधिकारी उपस्थित होते.

याच बरोबर जळगाव व असोदा दरम्यान असलेल्या रेल्वेगेटजवळ उड्डाणपुलाची निर्मिती होणार असल्यामुळे जळगाव ते यावलमधील वाहतुकीला गती येणार आहे. त्याअनुषंगाने गेल्या मे महिन्यात असोदा रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचे शुभारंभ होऊन भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली होती. हा रेल्वे उड्डाणपुल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वेतर्फे संयुक्तपणे करण्यात येणार असून याची जबाबदारी महारेलवर टाकण्यात आलेली आहे.

दरम्यान, भूसंपादन प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काही तांत्रिक प्रश्न निर्माण झाल्यावर असोदा येथील काही शेतकर्‍यांनी महापौर जयश्री महाजन यांची भेट घेतली व त्यांचे म्हणणे मांडले असता महापौरांनी त्यांना आश्वासित केले होते. याचअनुषंगाने महापौरांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासमवेत चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर भूमापन विभागातील अधिकार्‍यांना बोलावून त्यांना सविस्तर विषयाची माहिती दिली. तसेच अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन शेतकर्‍यांची तांत्रिक अडचण तपासून अहवाल सादर करणे व तातडीने याविषयी कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिले.