⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

महापाैर, आयुक्त आणि नगरसेवक हरवले आहेत

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । खोटेनगर ते मांगिरबाबा मंदिर या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. याच बरोबर येथील नागरिकांना गटारीसाठीही मागणी कारवाई लागत आहे. यामुळे नागरिकांनी थेट महापौर, आयुक्त व नगरसेवक हरवले असे बोर्ड लावले आहेत. या वाॅर्डात कामे करण्याची इच्छा असल्यास ते लवकर करावीत, अशी विनंती करणारा फलक लावला आहे.


खोटेनगर ते चंदूअण्णानगर स्टाॅपपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर पावसाळ्यातून जाणे बिकट होते. रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी टाकण्यात आलेला मुरूमही निघून गेलेला आहे. या वाॅर्डातील सांडपाणी पाइपद्वारे खदानीत सोडले आहे. खदान बुजवण्यासाठी मनपाकडून वेस्ट मटेरियल व कचरा टाकण्यात येत आहे. त्या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास होत आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाइप नसल्याने रस्ता खोदून पाणी खदानीत सोडले आहे. खदानीपासून पुढे जाण्यासाठी रस्ता बंद आहे. रस्त्यावरच मुरूम टाकला आहे. त्यामुळे रस्ता व गटारीसाठी नागरिक संतप्त आहेत. त्यामुळे त्यांनी रस्त्यावर ‘आयुक्त, महापौर, नगरसेवक हरवले आहेत. महापालिकेचे सुस्त प्रशासकीय अधिकारी यांची खरोखरच काम करण्याची इच्छा असल्यास आमच्या वाॅर्डातील कामे लवकर मार्गी लावावे’ असा फलक वाॅर्ड क्रमांक ८ मधील समस्याग्रस्त व त्रस्त नागरिकांनी लावला आहे.