⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणांमुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर : खासदार रक्षा खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । महाविकास आघाडीच्या चुकीच्या आणि कुचकामी धोरणांमुळे राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे महिलांना संरक्षण देण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका खासदार रक्षा खडसे यांनी औरंगाबादमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत केली.

पुढे बोलतांना खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, राज्यातील बीड, साकीनाका, परभणी, डोंबिवलीसह अनेक ठिकाणी झालेला निर्भयांचा आक्रोश अद्यापपर्यंत सरकारच्या कानावर पडलेला नाही. महिला सुरक्षेच्या बाबतीत सरकारची बेफिकिरी चीड आणणारी आहे. महिला सुरक्षेसाठी तत्कालीन गृहमंत्र्यांनी शक्ती कायदा आणण्या्चया घोषणा केल्या. तो कायदा अद्याप लागू झालेला नाही. महिला अत्याचार रोखण्यासाठी २०२० साली नवी नियमावलीही जाहीर करण्यात आली. त्यानुसार महिलांवरील अत्याचाराची एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई, बलात्काराचा तपास दोन महिन्यात पूर्ण करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रात एफआयआर नोंदवण्यात हलगर्जी, पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यात टाळाटाळ होत आहे. अशा पोलिसांवर कारवाई का होत नाही, असा सवालही खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थित केला.