⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावकरांचे अच्छे दिन सुरु, विकासकामांसाठी विरोधक-सत्ताधारी आले एकत्र

जळगावकरांचे अच्छे दिन सुरु, विकासकामांसाठी विरोधक-सत्ताधारी आले एकत्र

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरवासी गेल्या दिन वर्षांपासून खराब रस्ते, खड्डे आणि इतर समस्यांमुळे नरकयातना भोगत आहेत. जळगाव मनपात सध्या असलेले नगरसेवक पक्षबदलाच्या गडबडीत असल्याने त्यांना विकासकामांशी घेणेदेणेच नाही अशी ओरड होत होती. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये देखील गटतट असल्याने विकास कामात आडकाठी आणली जात होती. आमदार असो कि नगरसेवक कुणालाच शहरवासियांची पर्वा नव्हती. जो तो आपलीच पोळी शेकून घेण्यात धन्यता मानत होता. सोमवारी पार पडलेल्या महासभेत काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले जे जळगावकरांसाठी सुखावह आहे. एकाच महासभेत तब्बल ८५ कोटींच्या कामाला मंजुरी मिळाल्याने खऱ्या अर्थाने शहरवासियांचे अच्छे दिन सुरु झाले असेच म्हणावे लागेल.

जळगाव शहर मनपात आजवर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या आघाडीची सत्ता होती. सुरेशदादांनी शहराचा विकास केला नाही. शहर दिवसेंदिवस खड्ड्यात जात आहे. चीड येते या खड्ड्यांची, वर्षभरात शहराचा कायापालट करू अशी कितीतरी आश्वासने देत भाजपचे तत्कालीन मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात सुरेशदादांच्या अभेद्य गडाला सुरुंग लागला. जळगाव शहर मनपावर भाजपचा झेंडा फडकला. जळगावकरांनी भाजपवर विश्वास ठेवत त्यांच्याकडे एकहाती सत्ता दिली. वर्षभरात शहराचा कायापालट होण्याची अपेक्षा लावून असलेल्या जळगावकरांना निधी तर भरपूर मिळाला पण नियोजन नसल्याने सुविधा तर सोडाच पण जे आहे ते देखील दुरुस्त होऊ शकले नाही.

भाजपच्या अंतर्गत वादामुळे शहरवासी भरगोस निधी असून देखील विकासकामांपासून वंचित राहिले. अगोदरचे अडीच वर्ष त्यांना भूमिगत गटारी आणि अमृत योजनेच्या कामाचे देखील नियोजन करता आले नाही. वेळेत होणारे काम रखडले आणि जळगावकरांना पुन्हा नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. मनपातील भाजपचे नगरसेवक गळाला लावत काही महिन्यांपूर्वी शिवसेनेने सत्ता काबीज केली. नगरसेवकांनी इकडून तिकडे उड्या मारल्या, मोठे अर्थकारण शिजले, जळगावकरांनी शिव्यांची लाखोली वाहिली परंतु कुणालाही काहीही देणे घेणे नव्हते. जे भाजप सोडून शिवसेनेत गेले त्यापैकी काही पुन्हा भाजपत परतले. पक्ष बदलाच्या गडबडीत शहराच्या विकासावर बोलायला त्यांना वेळच मिळाला नाही किंबहुना त्यांनी स्वतःच लक्ष दिले नाही.

भाजपच्या काळात मंजूर झालेला निधी पुन्हा मिळवणे, नव्याने निधी मिळविणे, प्रलंबित कामांना मंजुरी घेणे, कामांचे कार्यादेश देणे यासाठी शिवसेनेने लागलीच पुढाकार घेतला. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून निधी दिला. गेल्या दोन महासभा वादळी ठरल्यानंतर सोमवारी विविध विकासकामांच्या मंजुरीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. जळगावकरांच्या हितासाठी दोन्ही पक्ष एकत्र येणार कि विरोधात जाणार असा प्रश्न उपस्थित होत असताना काहीतरी वेगळेच आणि सकारात्मक चित्र पाहावयास मिळाले. सुवर्ण जयंती नागरी नगरोत्थान योजनेंतर्गत जळगाव मनपाला मिळालेल्या ४२ कोटींच्या कामांसह इतर सर्व कामांच्या विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

४२ कोटींच्या कामांना कार्यादेश देताना भाजपच्या काही नगरसेवकांच्या प्रभागातील कामे घेण्यात आली नसल्याची खंत बोलून दाखवत उर्वरीत ५८ कोटींच्या कामात सर्वांच्या प्रभागातील कामे घेण्याची मागणी त्यांनी केली. रस्त्यांच्या कामाला प्राधान्य देण्यासाठी आज सर्व एकत्र आले हि जळगावकरांच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. शहरवासियांना अच्छे दिन लवकरच दिसणार असल्याची आजपासून सुरुवात झाली असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही. स्वतःच्या स्वार्थापोटी एकत्र येणारे नगरसेवक जनतेसाठी जेव्हा एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थाने ते लोकसेवक ठरतात. निधी कुणी आणला आणि कुणाच्या कार्यकाळात त्याला मंजुरी मिळाली यावर चर्चा न करता आता लागलीच कामाला सुरुवात झाली तरच पुढील पंचवार्षिकला नगरसेवक जनतेसमोर जाऊ शकतील.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.