जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२४ । यंदा मान्सून पाऊस चांगला झाला असून यामुळे जळगाव जिल्ह्यातील छोटे- मोठे अनेक प्रकल्प ओसंडून वाहत आहे. मात्र अमळनेर तालुक्यातील रुबजीनगर ते हिंगोणे गावादरम्यान बोरी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला भगदाड पडल्याने त्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. याचा विपरित परिणाम सिंचनावर होणार आहे. त्यामुळे निकृष्ठ काम झाल्याचा आरोप करुन ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अमळनेर तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बोरी नदीवर बंधारे बांधण्यात आले आहेत.
रुबजीनगर वस्तीच्या पुढे आणि हिंगोणे गावाच्या अलीकडे मे महिन्यात बंधारा बांधण्यात आला होता. मात्र, पहिल्याच पुरात बंधाऱ्याच्या पश्चिमेला एका कोपऱ्याला भगदाड पडल्याने नदीला आलेले पाणी त्यातून वाहून जात आहे. नदीचा पूर ओसरल्यावर जो पाणीसाठा याठिकाणी होणार होता, तो बंधाऱ्यांमुळे वाहून जाणार आहे. परिणामी सिंचन क्षमता कमी होऊन शेती व्यवसायावर विपरित परिणाम होतील. शिवाय आजूबाजूच्या गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते.
त्यामुळे बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप शिवाजी पाटील यांच्यासह काही ग्रामस्थांनी केला आहे. तर वाळू चोरीमुळे खड्डा पडल्याने हा प्रकार घडल्याचे अधिकारी सांगत आहेत. एकंदरीत गैरकामामुळेच बंधाऱ्याचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, घटनास्थळी कमरे इतक्या पाण्यातून सुद्धा वाळू काढली जात असल्याचे दिसून येते. अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याने बंधारा फुटला असेल तर यावर्षी देखील त्यात पाणी साठणार नाही.
म्हणजे विहिरीची पाणी पातळी वाढण्यास कृत्रिम बाधा निर्माण झाली आहे. घटनास्थळी पुष्पा परदेशी व पियूष माळोदे या दोन अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीला पाठवण्यात आले असून त्या ठिकाणी वाळू चोरांनी वाळू खोदल्याने बंधाऱ्याच्या पायाखालील भाग मोकळा झाल्यामुळे बंधाऱ्याला भगदाड पडल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.