नागपूरकडून भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर मालगाडीचं कपलिंग तुटलं अन्….; सुदैवाने मोठा अपघात टळला

ऑगस्ट 17, 2025 5:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२५ । सर्वासामान्य माणसांसाठी रेल्वे प्रवास हा अत्यंत सुखकर असल्याचं म्हटलं जातं. मात्र अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू स्थानकाजवळ एक धक्कादायक घटना समोर आलीय. नागपूरकडून भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे महामार्गावर मालगाडीचे कपलिंग अचानक तुटल्याने गाडीचे दोन तुकडे झाले. इंजिनसह काही डबे पुढे निघून गेले तर गार्ड असलेले काही डबे मागे थांबले. रेल्वे पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला.

malgadi

मिळालेल्या माहितीनुसार, ही मालगाडी नागपूरकडून मुंबईकच्या दिशेने रवाना होत होती. ही घटना बोरगाव मंजू रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर पोल क्रमांक ५९९/१२ जवळ घडली. धावत्या गाडीचे कपलिंग अचानक तुटल्यामुळे गाडीचे दोन तुकडे झाले. घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दुरुस्तीचे काम सुरू केले.

या गोंधळामुळे नागपूरवरून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. मात्र, तातडीने गाड्यांचा वेग नियंत्रित करून आणि सुटलेले डबे सुरक्षित ठिकाणी स्थिर करून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने कपलिंग तुटण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.

मालगाड्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीतील त्रुटीमुळे की तांत्रिक बिघाडामुळे हा प्रसंग घडला याचा तपास सुरु आहे. या भागातून दररोज नागपूर, भुसावळ, मुंबईकडे अनेक गाड्या धावत असतात. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षेच्या उपाययोजनांकडे विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now