गुन्हेपाचोरा

विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी पसार झालेल्या वधूला अटक; सात दिवसाची पोलिस कोठडी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी पसार झालेल्या वधूला पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत अटक केली आहे. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील युवकाशी या तरुणीने १ लाख २६ हजार रुपये घेऊन विवाह केला होता. ही तरुणी खरगोन (मध्य प्रदेश) येथील असून ती विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी मध्य रात्रीतून पसार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत खरगोन व शिरपूर (धुळे) येथून नवविवाहितेसह तिच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले असून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाचोरा न्यायालयातून सात दिवसाची पोलिस कोठडी मिळवली आहे. याबाबत सदर युवती व तिच्या साथीदारांनी लग्नाचे आमिष दाखवून अनेक जणांची फसवणूक केली असल्याचा संशय पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी व्यक्त केला.

पिंपळगाव हरेश्वर येथील चेतन मिलान चौधरी, रा.संजय नगर याचा विवाह मध्य प्रदेशातील मोहमांडवी, जि.खरगोन येथील अलिफा उर्फ लक्ष्मी कोसन कोराडे यांचे सुरेश उर्फ मिलाल, सुलथा आर्य, रा. सोनवद, जि.सेंधवा, सुदामसिंग उर्फ आपासिंग सोकान्या पावरा रा. केंद्र, ता. शिरपूर व विश्राम धास्थरा, रा. मोहमांडळी यांचे मध्यस्थीने १ लाख २६ हजार रुपये घेऊन ३ मे रोजी झाला होता. दरम्यान विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी वधू अलिफा उर्फ लक्ष्मी कोसन कोराडे ही आपल्या शिरपूर येथील साथीदारासोबत रात्री दोन वाजता पसार झाली. घटनेप्रकरणी चेतन चौधरी याने ६ मे राेजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेंद्र वाघमारे यांनी रवींद्र पाटील, पंकज सोनवणे, मनोज बडगुजर, महिला पोलिस कर्मचारी योगिता चौधरी या पथकाची स्थापना करून त्यास १७ रोजी मध्य प्रदेशातील सोनवद, जि.सेंधवा येथे जावून सुरेश उर्फ मिलाल सुलथा आर्य यास ताब्यात घेऊन मोहमांडळी गाठले. यावेळी लतिफा उर्फ लक्ष्मी कोसन कोराडे ही घरीच आढळली. तिला पोलिसी खाक्या दाखवताच तिने रोख १ लाख २६ हजार व १० हजार असे एकूण १ लाख ३२ हजार रुपये रोख व १० हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने काढून दिले. पोलिस पथकाने वधू व तिच्या तीन साथीदारांना १९ रोजी पिंपळगाव हरेश्वर येथे आणले. त्यांना येथील न्यायालयासमाेर हजर केले असता त्यांना सात दिवसाची पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Related Articles

Back to top button