तर उत्कृष्ट माहितीपट – ‘खडकी टू संभाजीनगर ला पहिला क्रमांक

आपल्या चित्रपटातून भारतीय संस्कृती व ग्रामीण कला उमटू द्या – दिग्दर्शक भाऊराव कराडे
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२५ । अजिंठा फिल्म सोसायटी व देवगिरी चित्र साधना आयोजित तृतीय देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये ‘दारं’ या शॉर्टफिल्मला सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्मचा पुरस्कार मिळाला, तर द्वितीय पुरस्कार ‘पुरिया’ व तृतीय पुरस्कार ‘मलार’ या शॉर्टफिल्मला मिळाला. ८ व ९ फेब्रुवारी दरम्यान जळगांव येथील छत्रपती संभाजी नाट्यगृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्र नगरीत हा महोत्सव संपन्न झाला. या फेस्टिवलसाठी १५० शॉर्टफिल्म आल्या असून विशेष ७२ शॉर्टफिल्म दाखवण्यात आल्या.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी ना. मंत्री संजय सावकारे, रामलाल चौबे ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश चौबे, सामाजिक कार्यकर्ते भरतदादा अमळकर, सिनेट सदस्या नेहा जोशी, सामाजिक कार्यकर्ते उपेंद्रभाऊ कुलकर्णी, अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जयंत शेवतेकर, अभिनेते गिरीश कुलकर्णी, दिग्दर्शक नितीन भास्कर, दिग्दर्शक अरुण शेखर, प्रांत संयोजक किरण सोहळे, प्रांत सहसंयोजक विनीत जोशी, डॉ. जयंत लेकुरवाळे, प्रा. सुचित्रा लोंढे, सौ. अनघा गोडबोले, योगेश शुक्ल व शेकडो रसिक उपस्थित होते. या दोन दिवसीय महोत्सवात शॉर्टफिल्मचे स्क्रिनिंग, मास्टर क्लास, टुरिंग टॉकीजचे आयोजन करण्यात आले होते. आज मास्टर क्लासमध्ये दिग्दर्शक मिलिंद लेले यांनी चित्रपट कसा पहावा या विषयात तर, प्राध्यापक डॉ. शिवदर्शन कदम यांनी ग्रामीण भागातील तरुणांना चित्रपट क्षेत्रातील संधी आणि प्रशिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा शुक्ल व राजेंद्र देशमुख यांनी केले.
ना. संजय सावकारे यांनी कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले अश्या कार्यक्रमामुळे आपल्या खान्देशची कला वैभव अधिक वृद्धिंगत होत आहे. आपली खान्देशी गाणी देशभर वाजवली जातात. येत्या काळात आपले हे तरुण कलाकार सुद्धा देशात नावाजले जातील असा विश्वास आहे असे ते म्हणाले.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कराडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हंटले की तुम्हाला जो विषय आवडेल त्यावर काम करा. ग्रामीण भागातील कला, टॅलेंट कधीही कमी राहिलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना संधी मिळत नाही किंवा त्यांना यश येत नाहीं हा केवळ गैरसमज आहे. आपल्या कलेतून भारतीयता, आपली संस्कृती व आपल्या मातीतील वैशिष्ट्य प्रकट होऊ द्या. आपल्या स्थानिक बोलीचा सुद्धा चित्रपटात उपयोग होतो. त्यांनी योफिमा शिष्यवृत्ती प्राप्त तरुण कलाकार व श्रोते रसिकांशी संवाद साधला.
‘या’ शॉर्टफिल्म व कलाकारांना मिळाले पुरस्कार:
उत्कृष्ट माहितीपट – ‘खडकी टू संभाजीनगर’, माहितीपट द्वितीय – ‘चाहता हु मां तुझे कुछ और भी दू’, तृतीय माहितीपट – मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा, सर्वोत्कृष्ट कॅम्पस फिल्म – लुना एक्स एल १००, द्वितीय कॅम्पस फिल्म – द रिबाउंड, उत्तेजनार्थ कॅम्पस फिल्म – हू इज गिल्टी, सर्वोत्कृष्ट बालचित्रपट – शाळा सुटली, सर्वोत्कृष्ट पटकथा – अनिकेत दिलीप फरांदे (दारं), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – अनिकेत दिलीप फरांदे (दारं), सर्वोत्कृष्ट छायांकन – अनिकेत रत्नपारखी (पुरिया), सर्वोत्कृष्ट संकलन – अर्चना चैतन्य साळुंके (दारं), सर्वोत्कृष्ट संगीत – श्रीपाद लिंबेकर (पुरिया), सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना – देवा आव्हाड (दारं), सर्वोत्कृष्ट अभिनेता – बद्रीश कट्टी (पुरिया), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मिलन डिसुजा (मलार), सर्वोत्कृष्ट बाल कलाकार – मास्टर शौर्य अनिल पाटील (शाळा सुटली)