⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

गुडन्यूज..! मान्सूनच्या आगमनाची तारीख आली समोर, कधी दाखल होणार केरळात?

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२३ । देशातील मान्सूनवर एल निनोचा धोका असल्याचे बोलले जात आहे. एल निनोमुळे यंदा पाऊस कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसे काही दिवसापूर्वीच स्कायमेटने देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा पहिला अंदाज वर्तविला होता. मात्र यदां देशामध्ये सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. सलग पाचव्या वर्षी सामान्य पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वसामान्यांसाठीही आनंदाची बातमी आहे.

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मान्सूनमध्ये जून-सप्टेंबर या चार महिन्यांत 87 सेंटीमीटर पाऊस पडतो. ही आकडेवारी 1971-2020 च्या आकडेवारीवर आधारित आहे. यावेळी 87 सेंटीमीटरपैकी 96 टक्के म्हणजेच 83.5 सेमी पाऊस पडेल. तो सामान्य पावसासारखा आहे.

आजही देशातील ६० टक्के शेती मान्सूनच्या पावसावर आधारित आहे. ते म्हणाले की अंदाजात पाच गुणांची मॉडेल त्रुटी असू शकते, म्हणजेच पाऊस 91 किंवा 101 सेंटीमीटर असू शकतो. हवामानशास्त्राच्या अंदाजानुसार साधारण किंवा जास्त पावसाची 67 टक्के शक्यता आहे. IMD च्या आकडेवारीनुसार, भारतात 2019 मध्ये मान्सूनमध्ये 971.8 मिमी, 2020 मध्ये 961.4 मिमी, 2021 मध्ये 874.5 मिमी आणि 2022 मध्ये 924.8 मिमी पाऊस पडला.

दरम्यान, एल नीनोमुळे दक्षिण अमेरिकेजवळील प्रशांत महासागरातील विषुववृत्ताभोवती सामान्य तापमानापेक्षा जास्त उष्ण तापमान असते. हे मान्सूनचे वारे कमकुवत होण्याशी आणि भारतात कमी पाऊस पडण्याशी संबंधित आहे.

मान्सूनचे आगमन
देशात मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख १ जून आहे. या तारखेला मान्सून प्रथम केरळमध्ये दाखल होतो आणि नंतर पुढे सरकतो. मात्र मान्सून केव्हा दार ठोठावेल, याचा अंदाज १५ मेच्या आसपास वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे देशाच्या कोणत्या भागात किती पाऊस पडेल याचा अंदाजही जूनमध्ये जाहीर होणार आहे.

देशात मान्सूनच्या आगमनाच्या तारखा –
केरळ – १ जून
चेन्नई – ४ जून
मुंबई – ११ जून
रायपूर – १६ जून
वाराणसी – २० जून
आगरा – ३० जून
दिल्ली – २७ जून
चंदीगड – २६ जून
लडाख – २३ जून