धनुष्यबाण वाचण्यासाठी ठाकरेंची पळापळ : निवडणूक आयोगाला केली हि विनंती
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । शिवसेनेच्या चाळीस आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात जातात की काय ? असा प्रश्न उद्भवू लागला आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला दहा खासदारांनी दांडी मारली. यामुळे आता धनुष्यबाण वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात उघड दोन गट पडले आहेत. काही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत आहेत, तर काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंची बाजू घेतली आहे. तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हदेखील जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. यामळे आता उद्धव ठाकरे थेट निवडणूक आयोगात पोहोचले असून आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये,’ अशी मागणी केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ तब्बल ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर आता काही खासदारदेखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर काही नगरसेवक आणि कार्यकर्तेदेखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देताना दिसत आहेत.शिवसेनेचे खासदार शिंदे गटात असल्याचे दावा गुलाबराव पाटील यांनी केला होता. त्यानंतर भाजपासोबत जायला हवं असे मत खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केलं होतं. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवाराला आपण मतदान करावं अशी मागणी शिवसेनेच्या काही खासदारांनी केली होती.
यामुळे आता उद्धव ठाकरे सध्या एकाकी पडले असलेले चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. आधी आमदार, नंतर नगरसेवक आणि आता खासदारही निघून जात असल्याचे चित्र आहे. या सर्व घडामोडी घडत असताना शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा केलेला आहे. आगामी काळात शिंदे गटाकडून शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरदेखील दावा केला जाऊ शकतो. असे असताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वरील मागणी करणारे कॅव्हेट दाखल केले आहे.