मंगळवार, सप्टेंबर 12, 2023

खडसेंची मस्ती जिरली नाही का? गिरीश महाजनांचा जोरदार प्रहार

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२३ । मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. सरकारचं शिष्टमंडळ गावाकडे निघाला असून जालन्याकडे निघण्यापूर्वी औरंगाबाद विमानतळावर या शिष्टमंडळाने माध्यमांशी संवाद साधला.

आम्ही उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी चाललो आहे. आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा वेळ द्यावा अशी मागणी आम्ही करणार आहोत. मात्र या सर्व गोष्टींसाठी थोडी सबुरी ठेवावा लागेल असं राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले आहे. तसेच यावेळी गिरीश महाजन यांनी खडसेंच्या टीकेवर जोरदार प्रत्त्युत्तर दिल आहे.

वापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती असून, यांना मस्ती आल्याची टीका एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली होती. त्यांच्या टीकेला गिरीश महाजन यांनी देखील उत्तर दिलं आहे. “आमची मस्ती काढता, खडसे यांची मस्ती जिरली नाही का? तुमची काय अवस्था झाली आहे. तुम्ही सत्ता सर्वात जास्त भोगली असून लोकांनी तुमची मस्ती उतरवली आहे, अशी टीका महाजन यांनी खडसे यांच्यावर केली आहे.