जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२१ । धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून तणाव निर्माण होऊन पोलिसांना फायरिंग करावी लागली होती. घटनेत दोन जण जखमी झाले असून दुसऱ्या एका घटनेत मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. रात्री अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर धुळ्यात तणावाची स्थिती निर्माण झाली. जळगावात कायदा व सुव्यवस्था राखला जावा यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे.
दोंडाईचा येथे मुलीची छेड काढण्यावरून मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमला होता. पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आल्याने पोलिसांनी केलेल्या फायरिंगनंतर दोघे जखमी झाले होते. जखमीला रुग्णालयात पाहण्यासाठी जात असलेल्या तरुणाला काही जणांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. धुळे जिल्ह्यात घटनेचे पडसाद उमटले असून तणावाचे वातावरण निर्माण झाले. जळगाव जिल्हा देखील संवेदनशील असून कायदा व सुव्यवस्था राखली जाण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. मध्यरात्री जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी तत्काळ सर्व पोलीस ठाण्यांना वायरलेसद्वारे खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. रात्री सर्व प्रभारी निरीक्षकांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस जीपद्वारे संवेदनशील परिसरात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन लक्ष ठेवून असून गुप्तचर विभाग आणि गोपनीय विभागामार्फत वेळोवेळी माहिती घेतली जात आहे.